
मुंबई प्रतिनिधी
“पाकिस्तानविरोधातील लढाईत भारताने निर्णायक विजय मिळवण्याची संधी गमावली आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भीरु नेतृत्व!” अशा ठाम शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारला जबरदस्त धारेवर धरलं. ते म्हणाले, “इराणसारखा देश अमेरिकेच्या अध्यक्षांना म्हणजे ट्रम्पना भीक घालत नाही. पण मोदींनी तशी भूमिका घेतली नाही. नरेंद्र मोदी हे कणा नसलेलं नेतृत्व आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराला पाकिस्तानला निर्णायक धडा शिकवण्याची संधी होती. मात्र अमेरिकेच्या दबावामुळे मोदींनी युद्धबंदीची घोषणा करून ती संधी गमावली.”
“पंतप्रधान भित्रे, भागूबाई आहेत!”
प्रकाश आंबेडकर यांची टीका थांबली नाही. त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांना भित्रे आणि भागूबाई म्हणत म्हणाले, “एकदा लष्कराला युद्धाचे अधिकार दिले, तर त्यात पंतप्रधानांनी हस्तक्षेप का करावा? हवाई दल दोन दिवसांत नियंत्रण मिळवू शकतं, मग पाकिस्तान सात दिवस कसं लढणार? 1971 सारख्या निर्णायक युद्धाची पुनरावृत्ती होऊ शकली असती. पण पंतप्रधान मोदींनी ती गमावली. का? हे भाजपने उत्तर द्यावं.”
“ट्रम्प ठरवत होते भारत-पाक युद्धाची वेळ”
त्यांनी आणखी एक खळबळजनक दावा करत सांगितलं की, “भारत-पाकिस्तान युद्धाचं नियंत्रण ट्रम्प यांच्या हातात होतं. किती दिवस लढायचं, कधी थांबायचं — हे सगळं ट्रम्प ठरवत होते. आणि मोदींमध्ये त्यांच्या विधानाला खोडून काढण्याची धमक नाही.”
“अग्निवीरांना न्याय नाही, सरकार असंवेदनशील”
शहीद झालेल्या अग्निवीरांविषयीही प्रकाश आंबेडकर भावुक झाले. त्यांनी सांगितलं की, “घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये राहणारे मुरली नाईक पाकिस्तानविरोधात युद्धात शहीद झाले. पण त्यांच्या कुटुंबाला एक कोटींची मदत मिळाली नाही. ही दु:खद बाब आहे. अग्निवीरांना सुद्धा शहीदांचा दर्जा, सन्मान व मदत मिळाली पाहिजे.”
“दिल्ली हायकोर्टात याचिकाही दाखल झाली, पण केंद्र आणि राज्य सरकार काहीच करत नाही. मी उप.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे वेळ मागितली आहे. जर सरकारने न्याय दिला नाही, तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावू,” असा इशाराही त्यांनी दिला.
प्रकाश आंबेडकरांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, त्यांच्या या वक्तव्यावर भाजप काय उत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.