
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | माहिम परिसरातून बेपत्ता झालेली सहा वर्षांची चिमुरडी अखेर सुखरूप सापडली असून, तिचा शोध घेण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या माहिम पोलिसांना यश आलं आहे. धारावी परिसरातून या मुलीचा शोध लागला असून, पोलिसांनी तिला कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं आहे.
सोमवारी (९ जून) सकाळी दूध आणण्यासाठी घराबाहेर पडलेली मुलगी परत आली नाही. काही वेळातच तिचा शोध सुरू झाला. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी विविध ठिकाणी शोध घेतला, पण मुलीचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अखेर शेजाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांनी माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तातडीने तपास सुरू केला. परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथकांची स्थापना करण्यात आली. त्यापैकी एक पथक सीसीटीव्ही फूटेज तपासत होतं, तर उर्वरित तीन पथकं माहितीच्या आधारे शोध घेत होती.
तपासादरम्यान, मुलगी धारावीच्या दिशेने जाताना सीसीटीव्हीत दिसून आली. ही माहिती इतर पथकांना देताच शोध मोहिमेला वेग आला. अखेर रात्री ११.१५ च्या सुमारास धारावीतील मोठ्या मशीदेसमोर पोलिसांना ही चिमुरडी सापडली.
तपासात हीच बेपत्ता मुलगी असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तिला तात्काळ माहिम पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. यानंतर कुटुंबीयांना माहिती देऊन मुलीचा ताबा त्यांना सुरक्षितपणे सोपवण्यात आला.
या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षमतेचं सर्वत्र कौतुक होत आहे.