
उमेश गायगवळे |पत्रकार
मुंबई| वांद्रे स्थानकाच्या पूर्व बाजूस असलेल्या रिक्षा चालकांची मनमानी दिवसेंदिवस वाढत असून, महिला प्रवाशांना जबरदस्तीने रिक्षात बसवण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याची तक्रार महिला प्रवाशांनी केली आहे. काही रिक्षा चालक थेट स्टेशनच्या जिन्यावर चढून मोठमोठ्याने आरडाओरडा करत प्रवाशांना रिक्षात बसवण्याचा अरेरावीपणा करत असल्याने महिला प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वांद्रे पूर्व परिसरात वांद्रे न्यायालय, म्हाडा, जिल्हाधिकारी कार्यालय, कामगार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, इंडियन ऑइल भवन, आयकर भवन, तसेच बीकेसीतील प्रमुख बँकांचे मुख्यालय आदी महत्त्वाची कार्यालये असल्याने येथे प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सकाळ-संध्याकाळच्या पीक अवरमध्ये स्थानक परिसरात वाहतूक कोंडीबरोबरच रिक्षा चालकांची अरेरावी अधिकच त्रासदायक ठरते.
स्थानकाच्या जिन्यावर चढून प्रवाशांना जबरदस्ती रिक्षात बसवणे, महिला प्रवाशांना वाट अडवणे, आरडाओरड करत गोंधळ घालणे हे प्रकार दिवसेंदिवस वाढले असून, अनेक महिला प्रवाशांनी या प्रकाराला कंटाळून तक्रारी करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
तसेच, स्थानिक रिक्षा चालक मीटर न लावता ठरावीक अंतरासाठीही प्रवासास नकार देतात. शासकीय वसाहत, निर्मल नगर, जवाहर नगर यांसारख्या परिसरात रिक्षा चालक जायला तयार नसल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गाचा शोध घ्यावा लागतो किंवा पायपीट करावी लागते.
या संदर्भात महिला प्रवासी मनीषा तायडे, शुभांगी गोरे, साक्षी गायकवाड यांच्यासह इतरांनी आवाज उठवत सांगितले की, “ही रोजचीच समस्या झाली आहे. आम्ही निर्मल नगर पोलीस, वाहतूक पोलीस आणि संबंधित प्रशासनाकडे कारवाईची मागणी करतो. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
या प्रकाराला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.