
मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून मे आणि जून २०२५ या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर जमा करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात एकदम ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट डीबीटी च्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावर दिले जातात. मात्र, मे महिना संपूनही हप्ता न मिळाल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
मे महिन्याचा (११ वा हप्ता) आणि जून महिन्याचा (१२ वा हप्ता) एकत्र देण्याचे सरकारचे नियोजन असल्याची माहिती मिळाली आहे. म्हणजेच १५०० + १५०० = ३००० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी जमा होण्याची शक्यता आहे. हे पैसे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी जमा होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सद्यःस्थितीत सरकारकडून यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मात्र,मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक कारणांमुळे मे महिन्याचा हप्ता लांबला असून तो आता जूनसोबत दिला जाण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम तारीख स्पष्ट होणार आहे.