
मंगळवेढा प्रतिनिधी
पत्नीला नांदवण्यासाठी सासू, सासरे आणि पती तिच्या माहेरी गेले असताना वादावादीचं वातावरण चिघळून हिंसाचारात रूपांतर झालं. दारातच भावाने सासऱ्याला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवेढ्यात घडली असून आरती अमोल पाटील (वय ३२, रा. मेटकरी गल्ली) असं मृत महिलेचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरती गेल्या चार-पाच वर्षांपासून माहेरी, शनिवार पेठेत राहत होती. पती अमोल अंबादास पाटील याच्याशी तिचे संबंध तणावपूर्ण होते. पती अमोल, सासरा अंबादास पाटील व सासू विमल पाटील हे तिला सासरी नेण्यासाठी माहेरी आले असता, तिच्या भावाने – प्रसाद रामचंद्र चौगुले – दारातच सासऱ्याला मारहाण केली. यामुळे संतापलेल्या अमोलने पत्नी आरतीवर धारदार चाकूने सपासप वार केले.
तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या हल्ल्यात आरतीचा सासरा अंबादास पाटील, भाऊ प्रसाद चौगुले व आई सोनाली चौगुले हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर मंगळवेढा परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्ढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मुख्य आरोपी अमोल पाटीलला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर करत आहेत.
या प्रकरणी मृत आरतीच्या आई सोनाली चौगुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल पाटील, अंबादास पाटील आणि विमल पाटील यांच्या विरोधात खून व इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरतीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.