
मुंबई प्रतिनिधी
अॅन्टॉप हिल परिसरात घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा छडा अवघ्या चार तासांत लावत पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांच्या अचूक आणि वेगवान तपासामुळे गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ गजाआड करण्यात आले.
२६ मे रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ईस्माईल अली शेख (वय ३७) याचा चाकूने गळा चिरून खून करण्यात आला होता. तो आपल्या कुटुंबासह राजीव गांधी नगर झोपडपट्टी, अॅन्टॉप हिल येथे राहत होता. या प्रकरणी मृताचे नातेवाईक निजाम अख्तार शेख (वय ३८) यांनी अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी संशयित पत्नी सुमय्या ईस्माईल अली शेख (वय २६) हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने खुनाची कबुली दिली आणि आपल्या प्रियकर सकलाईन गोलम किब्रिया शेख (वय २७) याचा सहभाग उघड केला. त्यानंतर गुप्त बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी आरोपी सकलाईन याच्या मिरा दातार दर्गा परिसरातील लपण्याच्या ठिकाणाचा शोध घेतला. पोलिसांनी सापळा रचत त्याला रेल्वे पटरीकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पकडले.
चौकशीत उघड झाले की, सुमय्या आणि सकलाईन यांचे अनैतिक संबंध होते. त्यांच्यातील संबंधांना सुमय्याचा पती अडथळा ठरत असल्याने त्यांनी मिळून खुनाचा कट रचला. पतीचा गळा चिरून खून करून मृतदेह घराच्या गॅलरीत ठेवण्यात आला होता.
पो.नि. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पो.नि. समीर कांबळे, स.पो.नि. सतिश कांबळे, शिवाजी मदने, प्रदीप पाटील, आण्णासाहेब कदम, तसेच इतर अनेक अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता.