
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील चर्चगेट येथे दगडाने डोकं ठेचून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. चर्चगेट परिसरातील मस्कती कोर्ट इमारतीजवळ फूटपाथवर ही धक्कादायक घटना घडली.
या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली. हत्येनंतर आरोपी फरार झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेटमधील मस्कती कोर्ट इमारतीजवळ गुरूवारी रात्री हत्येचा थरार घडला. एका अज्ञात व्यक्तीने फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीचं डोकं दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. हत्येची ही भयानक घटना शेअर बाजार दलाल हर्ष शाह यांनी पाहिली. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हर्ष शाह यांनी सांगितले की, ते नेहमीप्रमाणे २३ मे रोजी सकाळी ८.३० वाजता झवेरी बाजार येथील त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचले होते. काम संपवून त्यांनी दुपारी ३.४५ वाजता मस्कती कोर्ट इमारतीजवळ त्यांची स्कूटर पार्क केली आणि लोकल ट्रेनने मालाडच्या त्यांच्या ऑफिसला गेले. मालाडमधील त्यांचे काम संपल्यानंतर ते रात्री ११.२५ वाजता चर्चगेटला परतले आणि त्यांची स्कूटर घेण्यासाठी पार्किंगमध्ये गेले. त्यावेळी फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीवर एक जण जीवघेणा हल्ला करत होता.
डोक्याला रूमाल बांधेला, निळा-टीशर्ट आणि काळी पँट घातलेला माणून फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालत होता. आरोपीने झोपलेल्या व्यक्तीची दगडाने डोकं ठेचून हत्या केली. घाबरलेल्या शहा यांनी तात्काळ चर्चगेट स्टेशवर धाव घेतली. त्यांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. जेव्हा हर्ष शहा पोलिसांना घेऊन घटनास्थळी आले तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. पीडित व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.