
मुंबई प्रतिनिधी
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चैन तोडून पसार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशात आता मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील विजयनगर सोसायटी समोरील फुटपाथवरून रात्री शतपावली करणाऱ्या वृद्धाला धक्का मारुन त्यांच्या गळ्यातील दिड लाखांची दोन तोळ्याची सोन्याची तोडून चोरटे पसार झाले होते.
या तीन आरोपींना अंधेरी पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली आहे.
अंधेरी सहारा रोड कोल डोंगरी परिसरात राहणारे शंकर जोशी हे रात्री जेवण करून फिरण्यासाठी जात होते. नेहमीप्रमाणे रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास विजय नगर सोसायटी समोरील फूटपथावरून चालत असताना तीन अज्ञातांनी त्यांना धक्का दिला. धक्का का मारला हे विचारल्यानंतर त्यांच्या कानफाटात मारून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन घेऊन तिघेही फरार झाले होते.
‘३०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी’
घडल्या प्रकारानंतर त्यांनी अंधेरी पोलिसांत जात तिन्ही तरुणांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंद केला होता. दरम्यान परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पो. नि. विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरु केला. घटनास्थळासह अंधेरी स्थानक परिसरातील सुमारे २५० ते ३०० हून अधिक सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविली.
तिघांना मुब्रा येथून घेतले ताब्यात
दरम्यान सीसीटीव्ही फुटेजवरुन तिन्ही आरोपी वाकोला जंक्शन येथून एका गाडीत बसल्याचे दिसून आले. त्यानंतर या कार चालकाची माहिती काढून पोलिसांनी कार बुक करणाऱ्या व्यक्तीची माहिती काढली. माहितीनंतर पोलिसांनी मुंब्रा येथून वसीम शेख, शहिद शेख आणि तौफिक इंद्रीसी या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीची सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली आहे. चौकशीत ते तिघेही मुंब्रा येथील असून त्यांचा हा पहिलाच गुन्हा आहे. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील कोर्टात हजर करण्यात आले.