
मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या प्रशासनातील सर्वाधिक मानाचं आणि प्रभावशाली असलेलं मुख्य सचिव पद लवकरच रिक्त होणार आहे. सध्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक या ३० जूनला सेवानिवृत्त होत आहेत, आणि या पदासाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.
या शर्यतीत मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
गगराणी यांच्या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची पसंती असल्याचे संकेत मिळत आहेत. गगराणी यांचा कार्यकाळ मार्च २०२६ पर्यंत आहे, त्यामुळे त्यांना दीर्घकाळ मुख्य सचिव पदाचा कार्यकाल मिळू शकतो.
कोण आहेत इतर दावेदार?
या पदासाठी गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, तसेच राजेश कुमार आणि राजेश अगरवाल हेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
‘राजेश कुमार’
हे सेवाज्येष्ठतेत सर्वात पुढे असले तरी ते ऑगस्ट २०२५ मध्येच निवृत्त होणार आहेत, त्यामुळे त्यांचा कार्यकाल फक्त दोन महिन्यांचा राहील.
‘राजेश अगरवाल’
नोव्हेंबर २०२६ मध्ये निवृत्त होतील, परंतु त्यांचा राजकीय वजन कमी मानले जाते.
इक्बालसिंह चहल :
हे देखील या पदासाठी उत्सुक असून, सध्या जोरदार ‘फिल्डिंग’ लावत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत.
मुख्य सचिवपदाचे महत्त्व :
मुख्य सचिव हा राज्य प्रशासनाचा सर्वांत वरचा अधिकारी असतो. राज्य सरकारच्या धोरणांपासून निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे हे पद केवळ प्रतिष्ठेचं नव्हे तर सत्ता व निर्णयक्षेत्राच्या दृष्टीनेही अत्यंत प्रभावी मानलं जातं.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच सौनिक यांना हटवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला होता. आता त्यांचा सेवानिवृत्तीचा दिवस जवळ येताच नव्या चेहऱ्यासाठी हालचालींना वेग आला आहे.
वर्णी कोणाची लागणार?
गगराणी यांच्या प्रशासनातील अनुभवाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री त्रयीची पसंती असल्याने त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. चहल यांचे प्रयत्न आणि अगरवाल-कुमार यांच्या ज्येष्ठतेच्या मुद्द्यांवरही चर्चा सुरू असली, तरी ‘मुख्य सचिव’ कोण होणार, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.