स्वप्नील गाडे|प्रतिनिधी
मुंबई| मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने विशेष मोहिमेअंतर्गत पवई, ओशिवरा आणि दादर परिसरात तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. या मोहिमेदरम्यान एकूण ५.८० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह तीन ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे.
दिनांक ५ आणि ६ मे रोजी झालेल्या या कारवायांमध्ये पवईतील साकी विहार रोड परिसरातून १०८ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आला. या ड्रग्जची बाजारातील अंदाजे किंमत २१.६० लाख रुपये इतकी आहे. आझाद मैदान युनिटच्या पथकाने ही कारवाई केली.
त्यानंतर घाटकोपर युनिटने ओशिवरा येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातून २.०४ किलो उच्च प्रतीचा ‘हायड्रोपोनिक वीड’ जप्त केला. याची किंमत सुमारे २.०४ कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिसऱ्या कारवाईत वरळी युनिटने दादर पश्चिम येथील कॅटरिंग कॉलेजजवळून ३.५५ किलो हायड्रोपोनिक वीड जप्त केला. या ड्रग्जची बाजारभावाने किंमत ३.५५ कोटी रुपये इतकी आहे.
या तिन्ही घटनांमध्ये एकूण १०८ ग्रॅम एम.डी. आणि ५.५९ किलो हायड्रोपोनिक वीड असा एकूण ५.८० कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हे आरोपी उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक वीड मुंबईतील विविध भागांमध्ये पुरवत असल्याचे समोर आले आहे.
अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण विशेषतः उच्च शिक्षित तरुणांमध्ये वाढत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या मोहिमेमुळे अमली पदार्थ तस्करीला मोठा झटका दिला आहे.
या यशस्वी कारवायांसाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त शाम घुगे आणि सहाय्यक आयुक्त सुधीर हिरडेकर यांनी मार्गदर्शन केले. कारवाया आझाद मैदान युनिटचे प्रभारी पो.नि. राजेंद्र दहिफळे, घाटकोपर युनिटचे पो.नि. अनिल ढोले आणि वरळी युनिटचे पो.नि. संतोष साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या.
मुंबई पोलीस अंमली पदार्थमुक्त समाजनिर्मितीसाठी कटिबद्ध असून अशा कारवाया सातत्याने राबवल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.


