
यवतमाळ प्रतिनिधी
बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मानसिक तणावात आलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ तालुक्यातील पांढुर्णा येथे घडली.
हिना ज्ञानेश्वर आडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला. या निकालात हिनाला अपेक्षित यश न मिळाल्याने ती निराश झाली होती. दुपारच्या सुमारास घरी कुणीही नसताना तिने पंख्याला गळफास लावून जीवनयात्रा संपवली. तिचे कुटुंबीय यवतमाळ येथे लग्न समारंभासाठी गेले होते. घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला, ज्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस तपास करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.