
बंगळूर वृत्तसंस्था
कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची हत्या झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. बंगळुरूतील त्यांच्या निवासस्थानी रक्ताच्या थारोळ्यात ओम प्रकाश यांचा मृतदेह आढळलाय. १९८१ च्या बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असणाऱ्या ओम प्रकाश यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
घटना घडली तेव्हा पत्नी आणि मुलगी घरात होती. ओम प्रकाश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
ओम प्रकाश यांच्या हत्या प्रकरणी बंगळुरु शहर पोलिसांनी सांगितलं की, १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणाऱ्या कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची बंगळुरूच्या एचएसआर लेआउटमध्ये हत्या करण्यात आली. या घटनेचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.
पत्नीनेच पोलिसांना सांगितलं
ओमप्रकाश बंगळुरूत ज्या घरात राहत होते तिथं रविवारी दुपारी त्यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, घऱात पत्नी आणि मुलगी होती. मृतदेहावर जखमांचे व्रण होते. त्यावरून ही हत्या असल्याचं स्पष्ट होतंय. धक्कादायक म्हणजे पत्नीनेच पोलिसांना फोन करून हत्येची माहिती दिली. पण जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दरवाजा उघडण्यास नकार दिला.
घरगुती वाद किंवा तणावातून हत्येचा संशय
पोलिसांनी सांगितले की, पत्नी आणि मुलगी लिविंग रुममध्ये होत्या तर मृतदेह आतच पडलेला होता. पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. घरगुती वाद किंवा तणावातून ही हत्या झाल्याची शक्यता आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सर्व स्पष्ट होईल.