
रायगड प्रतिनिधी
रायगडच्या महड गावात जेवणातून विषबाधा प्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने निकाल दिला असून यातील एकमेव आरोपी असलेल्या महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या महिलेचे नाव प्रज्ञा उर्फ ज्योती सुरवसे असे आहे. तिनं जेवणात विष मिसळ्याचं कबूल केले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
2018 साली महड गावातील एका घरात वास्तूशांती कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी या कार्यक्रमातील जेवणातून 86 जणांना विषबाधा झाली होती. जेवणात विषारी कीटकनाशक टाकल्याने पाच जणांचा मृत्यू झाला होता. तत्कालीन तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू होता. अखेर या प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
कुटुंबातील सूनेनच हे कृत्य केले होते. सासू , नवरा नणंद तसेच कुटुंबातील लोक त्रास देत असल्याने महिलेने जेवणात किटकनाशके टाकल्याचे समोर आले होते. वास्तुशांतीच्या दिवशी ज्योतीने किटकनाशक औषध आणलं होतं. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तिने वरणाच्या बादलीत किटकनाशक औषध टाकले होते. ज्योती हिचा गावातील लोकांवरही राग होता म्हणूनच तिने हे पाऊल उचलले.
ज्योती सुरवसे हिचे सुरेश सुरवसे याच्याशी दुसरे लग्न झाले होते. मात्र कुटुंबातील सर्वजण नेहमी तिचा अपमान आणि मानसिक छळ करत असत. ज्योतीला सावळ्या रंगावरुन, तिला स्वयंपाक न येणे, तिचा पहिला विवाह मोडणे यावरून तिला सतत हिणवले जात असत. याचाच राग मनात ठेवून या सर्वांना धडा शिकण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे.