
ठाणे प्रतिनिधी
खारटन रोड परिसरातील नागसेन नगरमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, काही गावगुंडांनी सरकारी यंत्रणेला हाताशी धरून सार्वजनिक शौचालये, मुताऱ्या आणि महापालिकेच्या इमारतींनाच झोपड्या म्हणून दर्शवले आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
नागसेन नगर येथे सुरू असलेल्या एसआरए प्रकल्पासाठी प्रस्तावित झोपड्यांची संख्या ७१६ असतानाही प्रस्तावात ७४८ झोपड्या असल्याचे दाखवण्यात आले. त्यातील सुमारे ३२ झोपड्या भूखंडाबाहेर असल्याचा आरोप नागसेननगर रहिवासी संघर्ष समितीने केला असून, ही संख्या नंतर ८०० च्या वर गेल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात भारतरत्न सहकारी गृहनिर्माण संस्थेवर संशयाचे ढग दाटले असून, या संस्थेने मे २०२४ मध्ये झालेल्या सभेचे बोगस कागदपत्र तयार करून रहिवाशांच्या खोट्या सह्यांद्वारे प्रस्ताव सादर केल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात २०० रहिवासी उपस्थित असताना, सभेच्या अहवालात ६१२ जणांची उपस्थिती दाखवण्यात आली.
योजनेत लाभार्थी म्हणून नाव येण्यासाठी सार्वजनिक शौचालये, मुताऱ्या आणि महापालिकेच्या सामाजिक हॉलवर टिनाच्या पत्र्या टाकून त्यांना झोपड्या म्हणून दाखवण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर काही शौचालयांना टाळे ठोकून ते बंद ठेवण्यात आले आहेत, मात्र संबंधित ठेकेदारास मागील तीन महिन्यांचे सफाई बिल देण्यात आले आहे. यामुळे ठाणे महापालिकेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रहिवाशांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात पोहोचले, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नागसेननगर संघर्ष समितीचे सदस्य सुभाष ठोंबरे, नरेश पारचे, मनोज ढकोलिकाया आणि बाबू भाईर यांनी हा घोटाळा उघडकीस आणला.
एसआरए प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ३ मार्च रोजी महापालिकेला कारवाईचे पत्र दिले असून, लवकरच स्मरणपत्रही देण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाच्या मिनल पालांडे यांनी सांगितले.
या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागसेन नगरमधील एसआरए प्रकल्पात पारदर्शकता आणि चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.