
सातारा प्रतिनिधी
सातारा: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातार्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक या मार्गावर महाराष्ट्रातील पहिला म्युझिकल रोड साकारण्यात आला आहे. या रस्त्याचे लोकार्पण मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या रस्त्यावर डेकोरेटिव्ह लॅम्पवर स्पीकर बसवण्यात आले असून, पहाटेच्या वेळी भक्तिसंगीताच्या सुरांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. यामुळे सातारकरांना एक नवीन आणि आध्यात्मिक अनुभव मिळणार आहे.
पूर्वी अत्यंत खराब असलेल्या या मार्गावर वाहनचालकांना खाचखळग्यांमुळे त्रास सहन करावा लागत होता. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या संकल्पनेतून नगरोत्थान योजनेअंतर्गत १० कोटी रुपयांच्या निधीतून या मार्गाचे पुनर्विकसन करण्यात आले. आता हा मार्ग अत्याधुनिक व आकर्षक स्वरूपात साकारला आहे.
मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि नगर अभियंता दिलीप चिद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या मार्गावर विविध सुधारणा करण्यात आल्या. या म्युझिकल रोडवरील स्पीकर व्यवस्थेचे नियंत्रण नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातून केले जाणार आहे. हे संपूर्ण काम ए. एस. देसाई इन्फ्रा यांनी पूर्ण केले आहे.
सातार्यात प्रथमच असा अनोखा रस्ता तयार झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. पहाटे फिरायला येणार्या नागरिकांना भक्तिसंगीताचा आनंद घेता येणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी प्रकाशमय झालेला हा मार्ग देखण्या सौंदर्याने उजळून निघतो.