
सातारा प्रतिनिधी
जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असून, कोणत्याही पर्यटन स्थळी रेव पार्टी होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. यासाठी जिल्ह्यातील चेक पोस्टवर वाहनांची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नार्को कोऑर्डीनेशन सेंटर समितीची बैठक पार पडली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबनीस, राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहायक आयुक्त योगेश शिंदे, अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक व्ही.व्ही. पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी पाटील यांनी अंमली पदार्थविरोधी उपाययोजनांवर भर देत काही औषधांचा गैरवापर नशेसाठी केला जात असल्याची बाब लक्षात घेऊन, अशा औषधांची विक्री कोणत्या भागात जास्त होते याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने घ्यावी आणि सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.
अवैधरित्या गांजा व अफूची शेती होणार नाही यासाठी पोलीस विभागाने सतर्क राहावे. तसेच, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी.
जिल्ह्यातील मोठी हॉटेल्स, लॉज यांची पोलीस विभागाने वेळोवेळी तपासणी करावी. अंमली पदार्थ आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करावेत. तसेच, ड्रग्सची विक्री होणाऱ्या ठिकाणी अचानक धाडी टाकून अधिकाधिक गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.