
कोल्हापूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी महिनाभरापासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केल्यानंतर आज त्याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
यावेळी न्यायालयानं प्रशांत कोरटकरला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. सरकारी वकील यांच्याकडून सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाकडून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशांत कोरटकर याला नेत असताना त्याच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न झाला. यावेळी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी दोघांना पकडले. पोलीस आणि आंदोलन करते शिवप्रेमी यांच्यात मोठी झटापट झाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. अखेर कोल्हापूर पोलिसानी दोघांना देखील ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले.
दरम्यान, कोरटकरवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उदय लाड आणि जयदीप शेळके यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथूनअटक केली होती. यानंतर त्याला घेऊन पोलिसांचे पथक मंगळवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले आहे.
कोल्हापूर पोलिसांचे पथक मंगळवारीच सकाळी तब्बल 10 ते 15 तासांचा प्रवास करत सकाळी साडेसात वाजताच हजर कोल्हापुरात दाखल झाले. कोरटकरसोबत परिक्षीत नावाचा सहकारी पोलिसांच्या ताब्यात आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आल्यानंतर जैतापूर अटकेची कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून कोरटकरला 11 वाजता न्यायालयात हजर करण्यात आले.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर 25 फेब्रुवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यानंतर कोल्हापुरातील शिवप्रेमी संघटना आक्रमक झाल्या होत्या. सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. खबरदारी म्हणून कोल्हापूर पोलिसांकडून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
प्रशांत कोरटकर याच्याबाबत संताप व्यक्त असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतल्याचे दिसून आली होती. पण तरीही कोरटकरवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जुना राजवाडा पोलीस स्टेशन, छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय आणि न्यायालयाच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.