मुंबई प्रतिनिधी
मुंबई: कांदिवली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहित तरुणाने घरात घुसून आपल्या प्रेयसीवर चाकूने सपासप वार केले. आरोपीने लग्नानंतरही पीडितेसोबत शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली होती. त्यास नकार दिल्याने संतप्त आरोपीने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.
काही दिवसांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतरही तो प्रेयसीचा पिच्छा सोडत नव्हता. तो सातत्याने तरुणीवर रिलेशनशीपमध्ये राहण्यासाठी दबाव टाकत होता. तरुणीने नकार दिल्यानंतर नराधम आरोपीने घरात घुसून तरुणीवर जीवघेणा हल्ला केला आहे.
इमरान अहमद हुसैन चौधरी असं ३० वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. तो मुंबईतील कांदिवली परिसरातील रहिवासी आहे. त्याचे याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र इमरानच्या विवाहानंतर तरुणीने त्याच्यापासून दूर राहणं पसंद केलं होतं. ती इमरानपासून अंतर ठेवून राहत होती. तरीही तो रिलेशनशीपमध्ये राहण्यासाठी तरुणीवर दबाव टाकत होता. पण तरुणी सातत्याने आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी नकार देत होती.
घटनेच्या दिवशी आरोपी इमरान पुन्हा एकदा तरुणीच्या घरी गेला होता. यावेळी त्याने पुन्हा तिच्याकडे रिलेशनशीप ठेवण्याची विचारणा केली. पण यावेळीही तरुणीने आरोपीला स्पष्ट नकार दिला. याचा राग अनावर झाल्याने आरोपीनं चाकुने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती आसपासच्या लोकांना समजल्यानंतर लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने पीडित तरुणीला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
या घटनेची माहिती मिळाल्यानंचर कांदिवली पोलिसांनी आरोपी इमरान विरोधात खूनाच्या प्रयत्नासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तरुणीवर हल्ला केल्यानंतर आरोपी पळून गेला होता. मात्र मालवणी येथून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


