पुणे प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मुलींच्या वसतिगृहामध्ये मोठ्या प्रमाणावर दारुच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटं आढळून आलेली आहेत. रुममधील फोटो समोर आलेले आहे. या प्रकरणी एका विद्यार्थीनीने वसतिगृह प्रशासनाकडे तक्रार केलेली होती.अशीही माहिती समोर येत आहे.परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सिगरेटची पॉकेटचे फोटो आणि विडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वसतिगृहामध्ये वास्तव्य करीत असलेल्या एका विद्यार्थीनीने या सर्व गैरप्रकारची माहिती वसतिगृह महिला अधिकाऱ्याकडे वारंवार केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही. त्यानंतर संबंधित विद्यार्थीनी प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे.
महत्त्वाचं म्हणजे मुलींच्या वसतिगृह गेटवर बायोमेट्रिक उपकरणे आहेत. असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या गोष्टी आत कशा जातात, असा प्रश्न उपस्थित होतोय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने लेखी पत्रव्यवहार करून याप्रकरणी चौकशी समिती गठित करण्याची विनंती कुलगुरूंना करण्यात आलीय.
या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आली आहे. मुलींच्या रुममध्ये एवढ्या प्रमाणावर दारुच्या बाटल्या कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही बाटल्या संपलेल्या आहेत तर काहींमध्ये दारु शिल्लक आहे. तर ड्राव्हरमध्ये मोठ्या प्रमाणावर सिगारेटची पाकिटं आहेत. तसे व्हिडिओ समाज माध्यमावर आहेत.


