
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे’, ‘वुई वॉन्ट हायकोर्ट बेंच’, ‘सर्किट बेंच आमच्या हक्काचे’ यासह विविध घोषणा देत वकिलांनी काढलेल्या दुचाकी महारॅलीतून सर्किट बेंच मागणीकडे लक्ष वेधण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायालयासमोरून सुरू झालेल्या रॅलीमध्ये शेकडो वकिलांसह विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. मुख्यमंत्री तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची भेट होऊन लवकरात लवकर तोडगा काढावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविण्यात आले.
कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच व्हावे, या मागणीसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सोलापूरमधील वकिलांचा लढा सुरू आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांची भेट वारंवार लांबणीवर पडत गेल्याने प्रश्न प्रलंबित आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी ही महारॅली काढण्यात आली.
जिल्हा न्यायालयामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांना सर्किट बेंच मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्हा न्याय संकुलासमोरून महारॅलीला सकाळी सव्वाअकराच्या सुमारास सुरुवात झाली. आमदार सतेज पाटील यांनीही उपस्थित राहून रॅलीला पाठबळ दिले. सर्किट बेंच मागणीचे फलक, घोषणाबाजी करत रॅली धैर्यप्रसाद चौक, छत्रपती ताराराणी चौक, स्टेशन रोड, दसरा चौक, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सीपीआर चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात आली. अनेक वकिलांनी केलेल्या वेशभूषांमधून सर्किट बेंच मागणीकडे लक्ष वेधण्यात आले.
तीन निवेदने….
सर्किट बेंच स्थापनेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन चर्चा करावी, कोल्हापुरात आयुक्तालयाची स्थापना करून कोल्हापूर राज्याचा नवा विभाग घोषित करावा, नवोदित वकिलांना विद्यावेतन सुरू करून अपघाती विमा संरक्षण, ज्येष्ठ वकिलांना पेन्शन सुरू करावी, अशा तीन मागण्यांनी स्वतंत्र निवेदने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आली.
जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव खोत, माजी अध्यक्ष महादेवराव आडगुळे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्य विवेक घाटगे, संग्राम देसाई, शिवाजीराव राणे, संपतराव पवार, धनंजय पठाडे, राजेंद्र किंकर, संभाजीराव पाटील, राजेंद्र चव्हाण, विजयकुमार ताटे- देशमुख आदी वकिलांसह माजी महापौर आर. के. पोवार, स्मॅकचे सुरेंद्र जैन, इंजिनिअरिंग असोसिएशनचे बाबा कोंडेकर, मोहन कुशिरे, अशोक भंडारे, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, दिलीप पवार यांच्यासह वकीलवर्ग मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.