
कोल्हापूर प्रतिनिधी
दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या खेट्यांना आज, 16 फेब्रुवारीपासून सुरूवात झाले आहे. यासाठी जोतिबा नगरी अर्थातच वाडी रत्नागिरी सज्ज झाली असून, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिरातील डागडुजी सुरू केली आहे.
ग्रामपंचायतीनेही स्वच्छता आणि मुबलक पाण्याची सोय केली आहे. या जोतिबाच्या खेट्यासाठी राज्यभरातून लाखों भाविक दरवर्षी येत असतात.
माघ महिन्यात जोतिबा देवाचे पाच खेटे घातले जातात. या खेट्यांच्या निमिताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या खेट्यांना पहाटे 4 वाजल्यापासून प्रारंभ होतो. आजही काही भाविक कोल्हापूरातील पंचगंगा नदी काठी आंघोळ करून कोल्हापूरकर जोतिबाच्या नावानं चांगभलचा जयघोष करत डोंगराच्या दिशेने चालू लागतात. डोंगराभोवती असणाऱ्या जोतिबा देवाच्या डोंगर वाटाही गर्दीने फुलून जातात आणि ज्योतिबा डोंगर दुमदूमून जातो.
कोल्हापूर आणि जोतिबाचे खेटे ही परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. खरंतर या परंपरेविषयी पुरातन काळापासून अख्यायिका साांगितली जाते. आज आपण लोकल 18 च्या माध्यमातून ही परंपरा नेमकी काय आहे आणि हे मंदिर आणि शास्त्र अभ्यासक अॅड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून जाणून घेऊयात.
खेटे म्हणजे काय ?
जोतिबा डोंगरावर 4 रविवारी भरणाऱ्या यात्रेला जोतिबाचे खेटे असे म्हणतात. या खेट्याच्या रविवारी अनवाणी पायानेच डोंगर चालण्याची परंपरा आहे. यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यावेळी दर रविवारी जोतिबाचा डोंगर गर्दीने फुललेले दिसतो. सांगली, सातारा या भागातील भाविक मात्र गायमुख ते जोतिबा या दगडी पायरी मार्गावर आपले खेटे पूर्ण करतात. जोतिबा डोंगरावर 16 फेब्रुवारी पासून जोतिबाचे खेटे सुरू झाले आहेत. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
नेमकी परंपरा काय आहे..?
माघ पौर्णिमा झाल्यानंतर प्रत्येक रविवारच्या दिवशी भाविकांची जी यात्रा भरते, त्याला जोतिबाचे खेटे असे म्हटले जाते. या खेंट्यांच्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते, पूर्वी केदारनाथ आपली दक्षिणेकडील मोहीम संपवून हिमालयातकडे परत निघाले. हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी पायाने पळत आली आणि केदारनाथला न जाण्याविषयी विनवणी केली. तेव्हा केदारनाथाने वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर राहण्याचे मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूर ते जोतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजतागायत सुरु आहे. आपल्या देवीच्या कृतीचे अनुकरण करत आपल्या परिवाराचे आणि सर्वांचे सर्वतोपरी रक्षण देवाने करावे, या आर्त विनवणीसाठी भाविक हे खेटे घालत असतात, अशी माहिती ॲड. प्रसन्न मालेकर यांनी दिली.
देवस्थान समितीचं आवाहन
जोतिबा देवाच्या दर्शनाला अगदी पहाटे पासूनच भाविक अनवाणी पायांनी चालत डोंगर चढून दर्शनासाठी येत असतात. पूर्वी भाविक चालतच दर्शन घेण्यासाठी येत असत मात्र आता काळानुसार याचं स्वरूप बदलत आहे. तरीही परंपरेनुसार आजही काही भाविक चालत दर्शनासाठी येतात. तर काहीजण गाड्यांच्या सहाय्याने येतात. अगदी पहाटेपासूनच डोंगरावर येण्यास सुरुवात झाल्याने भाविकांची गर्दी प्रचंड वाढते. या दिवशी भाविकांनी कोणतेही गैरवर्तन करू नये. तसेच भाविकांनी पायी येताना डोंगर पेटवणे, आगी लावणे यासारखे प्रकार करू नयेत, असं आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आलं आहे.