
पुणे प्रतिनिधी
पुणे शहर पोलिसांनी महिलांच्या सुरक्षतेसाठी “महिला बीट मार्शल” पोलीस नेमण्यात आले आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर आता महिलांना अडचणीच्या काळात मदतीचा हात देण्यासाठी ‘महिला बीट मार्शल’ तात्काळ महिलांच्या आपत्कालीन परिस्थितीत पोचणार आहेत. हा उपक्रम पुणे पोलिसांनी सुरू केला आहे.
व्हिजीबल पोलिसींगच्या धर्तीवर तसेच पुणेकरांच्या तात्काळ मदतीसाठी आणि सुरक्षित भावना निर्माण करण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘कॉप-२४’ हा उपक्रम सुरू केला आहे. कॉप-२४ च्या माध्यमातून २४ तास बीट मार्शल शहरात पेट्रोलिंग करणार आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या महत्वाकांक्षी उपक्रमात ७२६ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यात ५२६ पुरूष व २०० महिला कर्मचारी आहेत. या कॉप्संना वेगळा ड्रेस कोडही केला गेला आहे. त्यांना १२३ दुचाकी वाहने तसेच ३९ सीआर मोबाईल व्हॅन (कार) देण्यात आल्या आहेत.
पोलिसांच्या हेल्पलाइनवर प्राप्त होणाऱ्या महिलांच्या तक्रार निवारणासाठी घटनास्थळी महिला बीट मार्शलची रवानगी करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे तक्रारदार महिलांना खुलेपणाने त्यांचे म्हणणे मांडता येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घघाटन
पोलिसांच्या कॉप २४ या उपक्रमाचे येत्या १५ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पोलीस मुख्यालयात पुणे पोलिसांचा ‘तरंग’ हा कार्यक्रम आयोजित केला असून, त्याठिकाणी मुख्यमंत्र्याकडून वेगवेगळ्या उपक्रमांना झेंडा दाखवून उद्घटान होणार आहे.
वाहनांना जीपीएस
‘कॉप २४’ या उपक्रमाअंतर्गत शहरात १२३ दुचाकी आणि ३९ कारचा वापर केला जाणार आहे. या सर्व वाहनांना ‘जीपीएस’ लावण्यात आले आहेत. त्याद्वारे बीट मार्शलवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. यामुळे बीट मार्शलकडून कामात हलगर्जी केली जाणार नाही, अशी शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
‘बॉडी कॅमेरा’
सर्व बीट मार्शलच्या वर्दीवर बॉडी कॅमेरा लावण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या वर्दीच्या ठिकाणी बीट मार्शल दाखल झाल्यानंतर तेथे घडणाऱ्या गोष्टींचे रेक़ॉर्डिंग होणार आहे. त्यामुळे पोलिसांवर कोणी आरोप करू शकणार नाही किंवा एखादा कर्मचारी चुकीच्या पद्धतीने वागल्यास त्याचीही माहिती त्या रेकॉर्डिंगमधून कळू शकते.
‘कॉप-२४’च्या माध्यमातून पोलिस शहरात गस्त घालणार असून, घटनास्थळी तत्काळ दाखल होणार आहेत. या बीट मार्शलसाठी निळ्या रंगाची वर्दी निश्चित करण्यात आली असून पुणे करांच्या सुरक्षिततेसाठी नाविन्य उपक्रम सुरू केल्याने नागरिका मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.