
शिर्डी प्रतिनिधी
प्रियकराच्या मदतीनेच आईने केला मुलाचा खून
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या स्वताच्या साडेचार वर्षांच्या मुलाला मारून त्याचे प्रेत चासनळी येथील नदीपात्रात टाकून देण्यात आले होते. याप्रकरणी मयत चिमुकल्याच्या आईसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आल्याची माहिती शिर्डी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
कार्तिक ज्ञानेश्वर बदादे (वय साडेचार वर्षे, रा. साकुरेसिंग, ता. निफाड, जि. नाशिक) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. कार्तिकची आई शीतल ज्ञानेश्वर बदादे व शीतलचा प्रियकर सागर शिवाजी वाघ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शिरीष वमने म्हणाले, सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी तपास करताना चासनळी परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी व तांत्रिक निरीक्षणावरून मयत मुलाचे प्रेत आणून टाकणारी व्यक्ती मुलाची आई व प्रियकर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गेल्या सव्वा महिन्यापासून पोलीस फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत होते.
शनिवारी (दि. 8) मुलाची आई शीतल बदादे ही दिंडोरी येथे आल्याचे समजताच पोलीस पथकाने तेथे जाऊन तिला अटक केली. पोलिसांनी तिच्याकडून प्रियकर सागर शिवाजी वाघ याची माहिती घेऊन त्याला आज सकाळी भऊर (ता. देवळा, जि. नाशिक) येथून अटक केली. दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून, प्रेमात अडसर नको म्हणून मुलाचा खून केल्याचे सांगितले. याबाबत पोलीस पाटील प्रकाश रामनाथ शिंदे (वय – 53, रा. चासनळी) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप कोळी, उपनिरीक्षक वैशाली मुकणे, कमलाकर चौधरी, संदीप बोटे, मधुसूदन दहिफळे, नवनाथ गुंजाळ, रमेश झडे, राजू शेख, नवाळी, खुळे, किसन सानप, सचिन धनाड यांच्या पथकाने ही विशेष कामगिरी केली.