मुंबई : प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील नागरिकांना आता उपचारासाठी मैलोनमैल प्रवास करण्याची गरज भासणार नाही. डोंगराळ भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ अर्थात फिरत्या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भौगोलिक परिस्थिती आणि पावसाळ्यातील दळणवळणाच्या अडचणींमुळे आरोग्य सुविधा पोहोचविणे कठीण होते. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडथळे निर्माण होत होते. ही समस्या लक्षात घेऊन जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यासाठी ४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
या फिरत्या रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसह तज्ज्ञ कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. निश्चित वेळापत्रकानुसार हे रुग्णालय दुर्गम गावांना भेट देऊन नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करणार आहे. तसेच प्राथमिक उपचार, आवश्यक वैद्यकीय चाचण्या आणि औषधांचे मोफत वाटप केले जाणार आहे.
माता व बाल आरोग्य, कुपोषण, हिवताप आणि क्षयरोग यांसारख्या आजारांचे लवकर निदान करून रुग्णांना वेळेत उपचार देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी जवळच्या मोठ्या रुग्णालयात तातडीने हलविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
याशिवाय दुर्गम भागातील नागरिकांना चोवीस तास आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसह सुसज्ज रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याकरिता १ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
फिरते रुग्णालय आणि रुग्णवाहिका सेवा मिळून या संपूर्ण आरोग्य प्रकल्पासाठी ६ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे गडचिरोलीतील खनिजबाधित आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यसेवा अधिक सहज उपलब्ध होणार आहे. उपचारासाठी करावा लागणारा प्रवास, वेळ आणि खर्च वाचण्यासही मदत होणार असल्याने आदिवासी नागरिकांसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


