मेढा प्रतिनिधी
मेढा : जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी एसटी बस आगार परिसरात भव्य सार्वजनिक वाहनतळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
उपमुख्यमंत्री तथा नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी शहरातील अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची गैरसोय याबाबत माहिती दिली. तसेच प्रस्तावित वाहनतळाच्या आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी आर्किटेक्ट स्वप्नील संकपाळ आणि संतोष टिपूगडे उपस्थित होते.
पर्यटन हंगामात महाबळेश्वरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. प्रस्तावित वाहनतळामुळे पर्यटकांना नियोजनबद्ध पार्किंग सुविधा मिळण्यासह शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
बैठकीला परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव, MSRTCचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक, संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांचे खाजगी सचिव उपस्थित होते. मुख्याधिकाऱ्यांनी प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव नगरविकास आणि परिवहन विभागाकडे सादर करावा, असे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिले.
पार्किंगचा प्रश्न सुटल्यास शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात येईल, असा विश्वास मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी व्यक्त केला.


