धुळे प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात एका गुणवंत तरुण डॉक्टरच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या २५ वर्षीय डॉ. आयुष चंद्रकांत पवार याने राहत्या घरी आत्महत्या केली. वैद्यकीय पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत प्रवेश न मिळाल्याने तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने आई, वडील आणि भावाप्रती प्रेम व्यक्त केले असून, आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे.
नेमकं काय घडलं?
डॉ. आयुष पवार हा शिरपूर शहरातील विद्या विहार कॉलनी येथे वास्तव्यास होता. त्याचे वडील चंद्रकांत मुलचंद पवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत, तर आई मनीषा एकनाथ पाटील या आर. सी. पटेल प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. आयुष हा या शिक्षक दाम्पत्याचा लहान मुलगा होता.
आयुष अभ्यासात अत्यंत हुशार होता. एमबीबीएसच्या NEET परीक्षेत त्याने टॉप टेनमध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर मुंबईतील नामांकित केईएम (KEM) रुग्णालयातून त्याने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठीही तो प्रयत्नशील होता.
पीजी प्रवेश प्रक्रियेत आयुषला १३०० रँक मिळाली होती. मात्र, पहिल्या फेरीत त्याला प्रवेश मिळू शकला नाही. या निकालामुळे तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
रात्री भावासोबत झोपला, सकाळी दुर्दैवी घटना उघड
११ नोव्हेंबरच्या रात्री आयुष घराच्या पहिल्या मजल्यावर आपल्या भावासोबत झोपला होता. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
‘आय लव्ह यू मम्मी, पप्पा, दादा‘
आयुषने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने लिहिले आहे, “माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका. माझे कुटुंबीय आणि मित्रांचा मी आभारी आहे. मी माझ्या जीवनात अयशस्वी झालोय. आय लव्ह यू मम्मी, पप्पा, दादा.”
चिठ्ठीच्या शेवटी त्याने स्वतःची सही केली आहे. आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी विनंती त्याने केली आहे.
NEET परीक्षेत टॉप टेनमध्ये स्थान मिळवणाऱ्या आणि KEM रुग्णालयातून एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या आयुषच्या मृत्यूने शिरपूर शहरासह वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.


