सांगली प्रतिनिधी
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षानंतर आता सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. सहकार क्षेत्रातील सत्तेची समीकरणे आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपने आक्रमक रणनीती आखली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांचे जिल्हा बँकेतील वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्षपदाबाबत भाजपची भूमिका स्पष्ट करताना, बँकेचा पुढील अध्यक्ष भाजप ठरवेल, असे ठाम संकेत दिले आहेत. त्यामुळे सांगलीच्या सहकार क्षेत्रातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.
२१ जागांचे गणित, सत्तेसाठी चुरस!
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदांसाठी झालेल्या निवडणुकीत सुरुवातीला १५ जागा बिनविरोध झाल्या, तर उर्वरित सहा जागांसाठी १ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. ३ नोव्हेंबरला जाहीर झालेल्या निकालात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि मिरजचे अण्णासाहेब कोरे यांनी विजय मिळवला.
विशेष म्हणजे, जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांनी ५४ मते मिळवत विजय मिळवला. तासगावमध्ये संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. कवठेमहांकाळमध्ये अजितराव घोरपडे यांनी रोहित पाटील समर्थक तानाजी पाटील यांचा पराभव केला. मिरजमध्ये अण्णासाहेब कोरे यांनी विजय मिळवला. या निकालांमुळे जयंत पाटील आणि रोहित पाटील यांच्या राजकीय गणिताला धक्का बसल्याचे मानले जात आहे.
भाजपचे संख्याबळ वाढले; संजयकाकांच्या भूमिकेला महत्त्व
निवडणुकीनंतरच्या पक्षीय बलाबलानुसार काँग्रेसचे सहा, भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे चार, शिवसेना (शिंदे गट) तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे दोन संचालक आहेत. उर्वरित एका जागेवरील समीकरणामुळे सत्तास्थापनेची लढाई अधिकच चुरशीची झाली आहे.
मात्र, संजयकाका पाटील यांची भूमिका या सत्तासंघर्षात महत्त्वाची ठरणार आहे. त्यांना भाजपच्या बाजूने आणण्यात यश आल्यास महायुतीचे गणित मजबूत होऊ शकते. त्यामुळे संजयकाका नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
चंद्रकांतदादांचे स्पष्ट संकेत; अध्यक्ष भाजपच ठरवणार!
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय भाजपच्या नेतृत्वाच्या भूमिकेनुसार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महायुतीच्या माध्यमातून किंवा नव्या राजकीय फॉर्म्युल्याने अध्यक्षपदाची निवड होऊ शकते; मात्र त्यामध्ये भाजपची भूमिका निर्णायक असेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवर निवडणुकीचा आर्थिक भार पडू नये, यासाठी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा आपला प्रयत्न होता. त्यातूनच २१ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी सर्व पक्षांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्रित निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मात्र, भाजपच्या या भूमिकेमुळे जयंत पाटील गटासमोर नवे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.
गोकुळचा प्रयोग आणि सांगलीतील राजकीय रणनीती!
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षाने सहकार क्षेत्रातील राजकारण पुन्हा ऐरणीवर आणले आहे. गोकुळमध्ये निवडून आलेल्या संचालकांच्या बहुमताचे गणित बदलण्यासाठी राज्य सरकारने पाच शासननियुक्त संचालक नेमण्याचा आणि त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या कायदेशीर वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित झाले आहेत. न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गोकुळमधील सत्तासंघर्ष अद्याप संपलेला नाही.
गोकुळमधील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा बँकेतील भाजपची रणनीतीही महत्त्वाची ठरत आहे. मात्र, गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांचा मुद्दा आणि सांगली जिल्हा बँकेतील संचालकांचे पक्षीय संख्याबळ ही दोन वेगवेगळी राजकीय व कायदेशीर समीकरणे आहेत.
जयंत पाटील आपले वर्चस्व टिकवणार की भाजप बाजी मारणार?
सांगली जिल्हा बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून जिल्ह्यातील सहकार, साखर कारखाने, विकास सोसायट्या आणि ग्रामीण राजकारणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या बँकेचे अध्यक्षपद मिळवणे म्हणजे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईत मोठी आघाडी मिळवण्यासारखे आहे.
एकीकडे जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आपले संख्याबळ टिकवण्याच्या प्रयत्नात आहेत, तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अध्यक्षपदासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे यांची भूमिका या लढाईत निर्णायक ठरू शकते.
गोकुळमध्ये सत्तेसाठी शासननियुक्त सदस्यांचा मुद्दा चर्चेत असताना सांगलीत भाजपने राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांचा सहकारातील गड भाजप खरोखरच भेदणार का, की जयंत पाटील पुन्हा एकदा राजकीय डाव टाकून सत्ता आपल्या बाजूने राखणार, याचा फैसला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत होणार आहे.


