वृत्तसंस्था
उधमसिंगनगर : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. उधमसिंगनगर जिल्ह्यातील किच्छा आणि सिराउली कलान या दोन नगरपरिषदांच्या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवत भाजपला पराभवाचा धक्का दिला. या निकालामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, काँग्रेसच्या आमदारांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
सिराउली कलान नगरपरिषदेत काँग्रेसच्या रशिदा बेगम यांनी फरहीन जहाँ यांचा १ हजार ७६३ मतांनी पराभव केला. भाजपने या ठिकाणी कोणालाही उमेदवारी दिली नव्हती. फरहीन जहाँ यांनी अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. किच्छा नगरपरिषदेत काँग्रेसचे उमेदवार राजेश प्रताप सिंह यांनी भाजपचे उमेदवार संदीप अरोरा उर्फ सोनू यांचा तब्बल ६ हजार २०० मतांच्या फरकाने पराभव केला.
किच्छाचे आमदार आणि काँग्रेस नेते टिळक राज बेहाद यांच्यासाठी हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे. मतदानानंतर टिळक राज बेहाद यांचा भाजपचे माजी आमदार राजेश शुक्ला यांच्यासोबत वाद झाल्याचा आणि ते ढसाढसा रडत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता निवडणुकीचा निकाल काँग्रेसच्या बाजूने लागल्यानंतर बेहाद आणि काँग्रेस कार्यकर्ते विजयाचा आनंद साजरा करत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.
राजेश प्रताप सिंह यांनी आपला विजय हा किच्छाच्या जनतेचा तसेच आमदार टिळक राज बेहाद यांचा विजय असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर किच्छा येथील नवीन मंडी संकुलात मतमोजणी पार पडली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेल्या वादामुळे हे प्रकरण हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले होते.
दोन्ही नगरपरिषदांसाठी २२ सप्टेंबर रोजी मतदान झाले होते. मतदानाच्या वेळी काही केंद्रांवर गोंधळ आणि तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मतमोजणीच्या वेळीही गोंधळ झाला आणि काँग्रेसचे खासदार टिळक राज बेहाद व भाजपचे माजी आमदार राजेश शुक्ला यांच्यात वाद झाल्याचे समोर आले. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या विजयाकडे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा संकेत म्हणून पाहिले आहे.


