ठाणे तालुक्यात २४, तर अंबरनाथमध्ये २१ पदे; २१ ऑक्टोबरपर्यंत करता येणार ऑनलाइन अर्ज
ठाणे प्रतिनिधी
ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील महसूल सेवक अर्थात कोतवाल पदासाठी प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये कोतवाल पदाच्या एकूण १११ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
महसूल व वन विभागाने २० ऑगस्ट २०२५ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार विशेष बाब म्हणून या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. ठाणे, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर या सहा तालुक्यांतील रिक्त पदांचा या भरतीत समावेश आहे. पदांच्या वितरणानुसार ठाणे तालुक्यात सर्वाधिक २४, अंबरनाथमध्ये २१, मुरबाड आणि शहापूरमध्ये प्रत्येकी १९, तर कल्याण आणि भिवंडीमध्ये प्रत्येकी १४ पदे रिक्त आहेत.
भिवंडीतील १४ पदांपैकी ११ पदे बिगर-पेसा क्षेत्रातील असून तीन पदे पेसा क्षेत्रातील आहेत. मुरबाडमधील १९ पदांमध्ये बिगर-पेसा क्षेत्रातील ११, पेसा ० ते २५ टक्के क्षेत्रातील चार आणि पेसा २५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रातील चार पदांचा समावेश आहे. शहापूरमधील १९ पदांपैकी आठ पदे पेसा ० ते २५ टक्के क्षेत्रातील, तर ११ पदे पेसा २५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रातील आहेत.
या भरतीमध्ये शासनाच्या नियमानुसार विविध सामाजिक प्रवर्गांसाठी आरक्षण लागू करण्यात आले आहे. अनुसूचित जातींसाठी १३ टक्के, अनुसूचित जमातींसाठी सात टक्के, विमुक्त जाती-अ तीन टक्के, भटक्या जमाती-ब २.५ टक्के, भटक्या जमाती-क ३.५ टक्के, भटक्या जमाती-ड दोन टक्के, विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के, इतर मागास वर्ग १९ टक्के, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग १० टक्के, आर्थिक दुर्बल घटक १० टक्के आणि खुल्या प्रवर्गासाठी २८ टक्के आरक्षण राहणार आहे. महिलांसाठी ३० टक्के समांतर आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
भरतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. २१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज, तर २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत परीक्षा शुल्क भरता येणार आहे. अर्जांची छाननी २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान होईल. त्यानंतर ४ ते १० नोव्हेंबरदरम्यान उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल.
कोतवाल पदासाठीची प्रत्यक्ष परीक्षा रविवार, १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी उत्तरसूची आणि निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर १७ ते २७ नोव्हेंबरदरम्यान कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असून पात्र उमेदवारांना २८ नोव्हेंबर रोजी नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.
भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत माहिती आणि ऑनलाइन अर्जासाठी https://thane.kotwal.org या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


