नाशिक प्रतिनिधी
नाशिकमध्ये पोलिस दलातील कर्मचाऱ्याच्या पत्नीने विष प्राशन करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीकडून होणारा कथित शारीरिक व मानसिक छळ, तसेच स्वतःच्या कमाईतून घेतलेला फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी होणारा दबाव याला कंटाळून दीपाली अनिल पवार (वय ३२, रा. क्लासिक निकेतन अपार्टमेंट, महात्मानगर) यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी त्यांचे पती अनिल पवार यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दीपाली पवार या जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी स्वतःच्या कमाईतून अहिल्यानगर येथे फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट दीर सुनील यांच्या नावावर करण्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींकडून त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या सततच्या त्रासातून त्यांनी विष प्राशन केल्याचे सांगण्यात येते.
विष प्राशन केल्यानंतर प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच दीपाली यांनी स्वतःच वाहन चालवत रुग्णालय गाठले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असतानाही पतीने उपचाराचा खर्च करण्यास नकार दिला आणि त्यांना जिल्हा रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडून तेथून निघून गेल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर पोलिस दलातही खळबळ उडाली.
दरम्यान, दीपाली यांच्या पगाराचे एटीएम कार्ड पती अनिल यांनी स्वतःकडे ठेवले होते आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढले जात असल्याचा आरोप आहे. सात वर्षांच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असल्याने दीपाली यांनी एटीएम कार्ड परत मागितल्यानंतर त्यांच्यावरील कथित छळ आणखी वाढला.
याशिवाय, कामाच्या ठिकाणाहून फोन आल्यास पतीकडून त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता आणि त्यातून मारहाण केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या त्रासाबाबत दीपाली यांनी यापूर्वी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती.
अनिल पवार हे यापूर्वी एसआरपीएफ दौंड येथे कार्यरत होते. सध्या ते नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे. सातपूर पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता ९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सातपूर पोलिसांकडून सुरू आहे.


