ठाणे प्रतिनिधी
ठाणे : ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, पोलिसांच्या तपासात या हत्येच्या कटाबाबत धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात ठाणे पोलिसांनी पप्या शिंदे, निखील यादव आणि नितेश पवार या तिघांना अटक केली आहे. तर संतोष उर्फ ‘टल्ली’ अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ‘टल्ली’ वारंवार आपले लोकेशन बदलत असल्याचे तपासात समोर आले आहे. तो दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर पसार झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे.
सहा महिन्यांपासून हत्येचा कट?
पूर्णेकर हत्याप्रकरणातील आरोपी पप्या शिंदेला न्यायालयात हजर करण्यात आले असता, पोलिसांनी तपासातील महत्त्वाची माहिती न्यायालयासमोर मांडली. पूर्णेकर कुटुंबीयांच्या वतीने अॅड. समीर हाटले यांनीही युक्तिवाद करताना तपासातील काही मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या हत्येचे नियोजन सुमारे सहा महिन्यांपासून सुरू असल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. आरोपींना गुन्ह्यानंतर गोव्याच्या दिशेने पळून जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहितीही समोर आली. पप्या शिंदेने कारची व्यवस्था केली होती, तर ‘टल्ली’ने दुचाकीची व्यवस्था केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तीन दुचाकींची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही न्यायालयात देण्यात आली.
महिनाभरात १५० फोन कॉल्स; संपर्काचा तपास सुरू
पप्या शिंदेने संबंधित आरोपींशी महिनाभरात तब्बल १५० वेळा फोनवरून संपर्क साधल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. या कॉल्सचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पप्या शिंदेने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर मोबाईल क्रमांक घेतल्याचेही तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २९ सप्टेंबर रोजी प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात पप्या शिंदे स्वतः उपस्थित होता. पूर्णेकर बेसावध असल्याचे पाहिल्यानंतर त्याने बाहेर थांबलेल्या मारेकऱ्यांना इशारा केल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
घटनेच्या दिवशी तीन ठिकाणी भेटी?
हत्येच्या दिवशी आरोपी मनोरमानगर, पवारनगर आणि एका मॉल परिसरात भेटल्याची माहितीही पोलिसांनी न्यायालयात दिली. या भेटींचा आणि आरोपींच्या हालचालींचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी या प्रकरणात सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याचा दावा न्यायालयात केला आहे. तसेच आरोपी सुभाषविरोधात यापूर्वी सात गुन्हे दाखल असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. गुन्ह्याच्या हेतूबाबत माहिती असूनही काही बाबी लपवल्या जात असल्याचा दावा पोलिसांनी केला.
‘त्या’ दोन राजकीय व्यक्तींची चौकशी झाली का?
दरम्यान, पप्या शिंदेच्या वतीने अॅड. संग्राम शिंदे यांनी युक्तिवाद करताना महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. राम पूर्णेकर यांच्या पुरवणी जबाबात दोन राजकीय व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याचे सांगत, या दोघांची पोलिसांनी चौकशी केली आहे का किंवा त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत का, असा सवाल बचाव पक्षाने उपस्थित केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीच्या पोलीस कोठडीत ९ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणाच्या तपासातून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.


