पुणे प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाने आता वेगळे वळण घेतले आहे. आंदोलनाचा आज सातवा दिवस असून, एस. एम. जोशी पुल परिसरात पहाटेपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या पिंजरा गाड्यांसह सहा वाहने आंदोलनस्थळी दाखल झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या आठवडाभरापासून रोहित पवार यांच्यासह MPSC परीक्षार्थी आणि आंदोलनकर्ते एस. एम. जोशी पुल परिसरात ठिय्या आंदोलन करत आहेत. MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, तसेच आयोगाच्या कामकाजाबाबत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. मात्र, आंदोलनाला अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याने आंदोलन सुरूच आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पुढील वाटचालीकडे प्रशासनासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘पुणे बंद’च्या इशाऱ्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढला
MPSC अध्यक्षांच्या राजीन्याबाबत निर्णय न झाल्यास पुणे बंद करण्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर आज सकाळपासून एस. एम. जोशी पुलावर पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. शेकडो पोलिस कर्मचारी, पिंजरा गाड्या आणि इतर वाहने आंदोलनस्थळी दाखल झाल्याने पोलिसांकडून संभाव्य कारवाईची तयारी सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अचानक मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आल्याने आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आंदोलकांना हटवण्याबाबत किंवा कारवाई करण्याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
आंदोलकांना अलका चौकातून हलवणार?
गेल्या सात दिवसांत MPSC आंदोलनाला महाविकास आघाडीतील नेत्यांसह विविध राजकीय नेत्यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळत असतानाच आता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने आंदोलकांना अलका चौक परिसरातून हलवण्याची तयारी आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे.
काल आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे आमदार आदित्य ठाकरे यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे MPSC आंदोलनाला राजकीय पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे.
भाजपकडूनही ‘पुणे बंद करून दाखवा’चे आव्हान
दरम्यान, रोहित पवार यांनी पुणे बंदचा इशारा दिल्यानंतर भाजपकडून त्यांना पुणे बंद करून दाखवण्याचे आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे MPSCच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
एकीकडे रोहित पवारांचा पुणे बंदचा इशारा, दुसरीकडे भाजपचे आव्हान आणि त्याचवेळी आंदोलनस्थळी वाढवण्यात आलेला पोलिस बंदोबस्त, यामुळे आजचा दिवस MPSC आंदोलनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
राहुल गांधी आंदोलनस्थळी येणार?
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील MPSC आंदोलनाला भेट देण्याची शक्यता असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. मात्र, त्यांच्या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. आगामी एक-दोन दिवसांत राहुल गांधी आंदोलनस्थळी येऊ शकतात, असे संकेत रोहित पवार यांनी दिले आहेत.
त्यामुळे एस. एम. जोशी पुलावर आज पोलिसांकडून नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, आंदोलकांना हटवले जाते का आणि पुणे बंदच्या इशाऱ्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, याकडे आता संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.


