सातारा प्रतिनिधी
सातारा : सातारा शहरात सुरू असलेल्या ओढा स्वच्छता मोहिमेदरम्यान दुर्मीळ आणि वैशिष्ट्यपूर्ण कासव आढळून आल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या कासवाची पाठ कठीण कवचाऐवजी मऊ असून त्याची मान लांब आणि नाकाचा भाग नळीसारखा पुढे आलेला आहे. या वैशिष्ट्यांमुळे ते इतर कासवांपेक्षा वेगळे दिसते.
ओढा स्वच्छतेचे काम सुरू असताना हे कासव श्रीरंग काटेकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ सातारा रेस्क्यू टीमला माहिती दिली. त्यानंतर मयूर तिखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून कासवाला सुरक्षितपणे बाहेर काढले. प्राणीरक्षक ओंकार ढाले यांच्या मध्यस्थीने पुढे हे कासव वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. सध्या वनविभागाकडून त्याची आरोग्य व वैद्यकीय तपासणी सुरू असून, तपासणीनंतर त्याला योग्य नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.
या कासवाची मऊ व लवचिक पाठ, लांब मान आणि नळीसारखे नाक ही त्याची प्रमुख ओळख आहे. पाण्यात असताना ते संपूर्ण शरीर बाहेर न काढता नाकाचा टोकदार भाग पाण्याबाहेर आणून श्वास घेऊ शकते. चपटे शरीर आणि पायांवरील पटलांमुळे त्याला पाण्यात सहज पोहता येते. दलदलीचे, चिखलयुक्त आणि पाणथळ भाग हा त्याचा अधिवास असून लहान मासे, बेडूक आणि कीटक हे त्याचे प्रमुख खाद्य मानले जाते.
शेड्यूल-१मुळे सर्वोच्च संरक्षण
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार या कासवाचा समावेश (शेड्यूल-१’मध्ये)असल्याने त्याला सर्वोच्च स्तराचे कायदेशीर संरक्षण मिळते. त्यामुळे त्याला पकडणे, पाळणे, त्याची वाहतूक करणे किंवा त्याला त्याच्या अधिवासातून बाहेर काढणे कायद्याच्या कक्षेत येते. शिकार किंवा तस्करीसारख्या प्रकारांमध्ये दोषी आढळल्यास कठोर शिक्षेची तरतूद असून तीन ते सात वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशा वन्यजीवांना स्वतः हाताळण्याऐवजी वनविभाग किंवा अधिकृत रेस्क्यू टीमशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


