ठाणे प्रतिनिधी
ठाणे : मानपाड्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येने ठाणे हादरले असतानाच गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. उद्धव ठाकरे घरात पाऊल ठेवताच शोकाकुल कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. पत्नी विजेता, मुलगा राम आणि मुलगी यांच्याशी संवाद साधताना घरातील वातावरण अक्षरशः हेलावून गेले.
मंगळवारी रात्री प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करून तसेच धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मानपाडा, मनोरमा नगर आणि आझाद नगर परिसरात संतापाची लाट उसळली असून ठाकरे गटातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर कुटुंबीयांना धीर देताना, “सध्या जे काही करायचे आहे ते शांत डोक्याने करा. भावनेच्या भरात कोणतेही पाऊल उचलू नका,” असा सल्ला दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तसेच “आम्ही शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहू,” असा विश्वास त्यांनी कुटुंबीयांना दिला.
‘साहेब, तुम्ही घरी आलात… त्यांना आज आनंद झाला असता’
प्रदीप पूर्णेकर यांची उद्धव ठाकरे यांनी आपल्या घरी यावे, अशी इच्छा होती. उद्धव ठाकरे घरात आल्यानंतर कुटुंबीयांनी ही आठवण सांगताच वातावरण अधिकच भावूक झाले. “तुम्ही घरी आलात हे पाहून आज त्यांना खूप आनंद झाला असता,” अशा भावना कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.
या भेटीत पूर्णेकर कुटुंबीयांनी हत्येच्या तपासाबाबतही उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा आणि संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली.
‘एफआयआरमध्ये नावे घेण्यास पोलीस तयार नव्हते’
दरम्यान, पूर्णेकर कुटुंबीयांनी पोलिसांच्या तपासाबाबतही गंभीर आरोप केले आहेत. सुरुवातीला मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे एफआयआरमध्ये नोंदवण्यास पोलीस तयार नव्हते, असा दावा कुटुंबीयांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केला. मात्र, संजय राऊत घटनास्थळी आल्यानंतर या दोघांची नावे नोंदवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
मीनाक्षी शिंदे पोलीस ठाण्यात मागील मार्गाने आल्या आणि सही करून निघून गेल्याचा दावाही पूर्णेकर यांच्या पत्नीने केला. या आरोपांबाबत संबंधितांकडून वेगळी भूमिका मांडण्यात आली असून, आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
निवडणुकीपासूनचा संघर्षही कुटुंबीयांनी सांगितला
ठाणे महापालिका निवडणुकीतील कथित फेरफारांचाही संदर्भ पूर्णेकर कुटुंबीयांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडला. “माझी आई आणि काका निवडणुकीत विजयी झाल्याचे दिसत होते. मात्र, नंतर काहीतरी फेरफार झाला आणि दोघांचाही पराभव झाला,” असा दावा कुटुंबीयांनी केला.
तसेच निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. आपला पराभव करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना या भागात यावे लागले होते, असा दावाही कुटुंबीयांनी केला.
मानपाड्यात ठाकरे गटाचा आवाज; हत्येने राजकीय खळबळ
मानपाडा, मनोरमा नगर आणि आझाद नगर परिसरात प्रदीप पूर्णेकर यांचा स्थानिक राजकारणात प्रभाव होता. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रभावाचा बालेकिल्ला मानला जात असतानाही या भागात पूर्णेकर यांच्या माध्यमातून ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद कायम होती. त्यामुळे पूर्णेकर यांच्या हत्येने केवळ गुन्हेगारीच नव्हे, तर ठाण्याच्या स्थानिक राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे.
हत्येप्रकरणी पोलिसांनी पप्या शिंदे याला अटक केली असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. हत्येमागील नेमका कट, त्यामागील कारणे आणि या प्रकरणातील इतर संबंधितांची भूमिका तपासातून समोर येणे बाकी आहे.
एकीकडे कुटुंबीयांकडून न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास आणि सीबीआय चौकशीची मागणी होत असताना दुसरीकडे पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागचे खरे सूत्रधार कोण? या हत्येचा राजकीय संघर्षाशी काही संबंध आहे का? आणि कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांचे सत्य काय? याची उत्तरे आता तपासातूनच समोर येणार आहेत.


