नवी दिल्ली वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले. ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा देऊन ‘माफीचा साक्षीदार’ व्हावे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, देशातील निवडणूक व्यवस्था, संविधान आणि संस्थात्मक रचनेवर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक प्रक्रियेत कथित ‘मतचोरी’ होत असल्याचा आरोपही त्यांनी पुन्हा केला.
निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयप्रक्रियेवर आक्षेप नोंदवल्याचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी आपल्या आरोपांना त्यातून पुष्टी मिळत असल्याचे म्हटले. निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मागील दहा महिन्यांत आयोगाच्या विविध निर्णयांवर किमान १४ वेळा औपचारिक आक्षेप नोंदवल्याचा दावा त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भविष्यात चौकशी केली जाईल, असा दावा केला. निवडणूक आयोगाची व्यवस्था दुरुस्त झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद आणि निर्णयप्रक्रियेबाबत अलीकडेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. आयोगाच्या कामकाजात अंतर्गत चर्चा आणि अंतिम निर्णय यामध्ये फरक असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राहुल गांधी यांनी लोकशाहीतील सत्ताविरोधी प्रवाहाचाही मुद्दा उपस्थित केला. यापूर्वी देशातील अनेक प्रमुख नेत्यांना सत्ताविरोधी वातावरणाचा सामना करावा लागला, मग सध्याच्या राजकीय परिस्थितीत असा प्रवाह का दिसत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत अधिक माहिती पुढील काळात समोर येईल, असा दावाही त्यांनी केला.


