बारामती प्रतिनिधी
बारामती : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख निश्चित झाली आहे. येत्या २४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात येणार असून, त्यांच्या हस्ते ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन होणार आहे. तसेच विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संस्थेची पाहणी करून त्याबाबतचे सादरीकरणही पंतप्रधानांसमोर होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी बारामतीतील नक्षत्र गार्डन येथे उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’ची पाहणी केली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या मुख्यालयात संस्थेच्या पदाधिकारी व विश्वस्तांची बैठक घेऊन दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला युवा नेते युगेंद्र पवार, विश्वस्त विठ्ठल मणियार, प्रताप पवार, कृषी विकास प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलवडे, विश्वस्त किरण गुजर आणि सचिव नीलिमा गुजर आदी उपस्थित होते.
विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेले ‘प्रेरणास्थळ’ भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मृती आणि विचारांना समर्पित करण्यात आले आहे. शांतता, समता आणि मानवतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने या संकुलाची उभारणी करण्यात आली असून, येथे भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा तसेच विविध महापुरुषांच्या कार्याची आणि विचारांची माहिती देणारी मांडणी करण्यात आली आहे.
दरम्यान, शरद पवार विद्या प्रतिष्ठानच्या मुख्यालयात बैठकीसाठी पोहोचले असता त्यांचे स्वागत एका ह्युमनॉइड एआय रोबोटने केले. पवार यांच्याकडे रोबोट चालत आला आणि त्याने हात उंचावून त्यांचे स्वागत केले. पवार यांनी ‘चला’ असे म्हटल्यानंतर रोबोट बाजूला झाला. या घटनेचा व्हिडिओही चर्चेत आला आहे.
यापूर्वी पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा १६ ऑक्टोबरला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर तारीख बदलून आता २४ ऑक्टोबर निश्चित करण्यात आल्याचे वृत्त आहे. दौऱ्यादरम्यान एआय संस्थेची पाहणी आणि ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन हे प्रमुख कार्यक्रम असणार आहेत.


