
पुणे:प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या विविध विकासकामांचा उद्घाटन, भूमीपूजन तसेच उपक्रमांचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जाधववाडी, चिखली येथील एमएनजीएल पंपासमोर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.
कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशित्रण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह खासदार, आमदार आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
भूमीपूजन होणाऱ्या प्रकल्पांमध्ये पिंपरी येथील सुविधा भुखंडावर उभारण्यात येणारे मध्यवर्ती अग्निशमन केंद्र आणि अग्निशमन प्रबोधिनी इमारत, आकुर्डी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवन जवळ उभारण्यात येणारे अग्निशमन केंद्र, मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड (२४ मीटर डी.पी रस्ता) व सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड (१८ मीटर डी.पी रस्ता) तसेच या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या वाकड शिवेपर्यंतचा १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच पवना नदीवरील मामुर्डी ते सांगवडे दरम्यान जोडणारा पूल या विकासकामांचा समावेश आहे.
लोकार्पण होणाऱ्या विकासका उपक्रमांमध्ये स्मार्ट सिटीच्या वतीन अंतर्गत आणि भौगोलिक माहिती प्रणाली मध्ये विकसित केलेली संगणक प्रणाली तसेच चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाची नवीन इमारत, शहरातील विविध ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ (वेस्ट टू वंडर) वस्तूंपासून निर्मिती केलेल्या टिकाऊ कलाकृती, महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतींवर बसविण्यात आलेले रुफ टॉप सोलर सिस्टीम (सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प), सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन उपक्रम, उपक्रम यांचा समावेश आहे.