संगमेश्वर प्रतिनिधी
संगमेश्वर : गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या २२ वर्षीय इंजिनिअर तरुणाचा खाडीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना संगमेश्वर तालुक्यातील मेढे-मांजरेजवळील जांभळी बंदर येथे घडली. अथर्व राजेश देसाई असे मृत तरुणाचे नाव आहे. पोहता येत नसतानाही ओहोटीच्या वेगवान प्रवाहात पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) पथकाने मंगळवारी सायंकाळी अथर्वचा मृतदेह बाहेर काढला.
अथर्व हा मुंबईत वास्तव्यास असून, गणेशोत्सवानिमित्त तो पालकांसह मेढे-मांजरे-कळकदेकोंड येथे गावी आला होता. सोमवारी (दि. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अथर्व आणि त्याचे मित्र निर्मित मितेश देसाई, यश गणेश देसाई, शुभम गणेश देसाई व वेदांत मनीष देसाई हे घरातील कोणालाही न सांगता जांभळी बंदर येथे पोहण्यासाठी गेले होते.
सर्वजण पाण्यात उतरले असताना खाडीत ओहोटी सुरू होती. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगवान होता. मित्रांपैकी कोणालाही उत्तम पोहता येत नव्हते, तर अथर्वला पोहता येत नसतानाही त्याने पाण्यात उडी घेतली. प्रवाहात तो बुडू लागल्याचे लक्षात येताच मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, त्याला वाचवणे शक्य झाले नाही. घाबरलेल्या मित्रांनी वाडीत धाव घेत ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच डिंगणी दूरक्षेत्र व संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक गावीत, हेडकॉन्स्टेबल मांढरे, कॉन्स्टेबल म्हस्कर तसेच होमगार्ड यांनी शोधकार्य सुरू केले. त्यानंतर प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अथर्वचा मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आला.
अथर्व नुकताच इंजिनिअर झाला होता. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबीयांसह गावी आलेल्या या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, खाडी परिसरात भरती-ओहोटीमुळे पाण्याचा प्रवाह वेगवान होतो. त्यामुळे मुंबईसह अन्य शहरांतून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांनी तसेच पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरू नये, असे आवाहन प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले आहे.

