मुंबई प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकणातील मूळगावी जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने यंदा मोठी तयारी केली आहे. गणेशोत्सवानिमित्त देशभरात तब्बल ३८६ विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार असून, यामध्ये मध्य रेल्वेच्या २५८, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांचा समावेश आहे. मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन सीएसएमटी-सावंतवाडी रोडदरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष फेऱ्याही सोडण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेने ८ सप्टेंबरपासून मुंबई-सावंतवाडी रोडदरम्यान दैनंदिन एक्स्प्रेस सुरू केली आहे. त्यानंतर आता १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान सीएसएमटी-सावंतवाडी रोड मार्गावर चार अतिरिक्त विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या २.५० लाखांहून अधिक प्रवाशांनी आरक्षण केले आहे, तर सुमारे एक लाख प्रवासी अनारक्षित तिकिटांवर प्रवास करण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१००९ ही अनारक्षित विशेष रेल्वे १३ सप्टेंबर रोजी दुपारी १.४५ वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि १४ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल. परतीची ०१०१० विशेष गाडी १४ सप्टेंबर रोजी पहाटे ४.०५ वाजता सावंतवाडी रोडहून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे.
या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि झाराप यांसह कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. गाडीला १२ शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन अशी रचना असेल. सामान्य डब्यांसाठीचे तिकीट यूटीएस प्रणाली तसेच ‘रेलवन’ ॲपवर उपलब्ध होणार आहे.
गर्दीवर नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त
गणेशोत्सव काळात मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने रेल्वे पोलिसांनीही विशेष नियोजन केले आहे. सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, पनवेल आणि दिवा या स्थानकांवर कोकणाकडे जाणाऱ्या विशेष गाड्यांसाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेष रेल्वेगाड्यांची सुरक्षा, प्रवाशांची गर्दी आणि फलाटांवरील नियोजनासाठी सुमारे २५० अधिकारी, कर्मचारी आणि गृहरक्षक तैनात करण्यात आले आहेत. नियमित तीन हजार ५०० पोलिसांच्या ताफ्याबरोबरच गणेशोत्सवासाठी अतिरिक्त ४५० गृहरक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
लालबागचा राजा आणि चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन या दोन्ही स्थानकांवर विशेष गर्दी व्यवस्थापन करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांमध्ये समन्वय ठेवण्यात आला आहे.
संशयास्पद वस्तू दिसल्यास तातडीने माहिती द्या
गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. स्थानकावर किंवा रेल्वेगाडीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास ती हाताळू नये. तातडीने आरपीएफ, रेल्वे पोलीस, स्थानक व्यवस्थापक किंवा १३९ या रेल्वे मदतवाहिनी क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणकन्येत प्रवाशांना चढू न दिल्याने संताप
दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत असतानाच कोकणकन्या एक्स्प्रेसच्या सामान्य डब्यातील प्रवाशांनी ठाणे स्थानकात फलाटावरील प्रवाशांना गाडीत चढण्यास मज्जाव केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीएसएमटीहून सुटलेली कोकणकन्या एक्स्प्रेस ठाणे स्थानकात आल्यानंतर गाडीतील काही प्रवाशांनी दरवाजे आतून बंद करून घेतल्याचे फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या निदर्शनास आले.
गाडीत चढण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी फलाटावर उभे होते. मात्र, दरवाजे बंद असल्याने त्यांना गाडीत प्रवेश करता येत नव्हता. अखेर फलाटावरील प्रवाशांनी तेथे तैनात असलेल्या गृहरक्षकांना याची माहिती दिली. त्यानंतर हस्तक्षेप करून गाडीचा दरवाजा उघडण्यात आला आणि प्रवाशांना गाडीत प्रवेश देण्यात आला.
गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची संख्या वाढविली असली तरी सामान्य डब्यांमधील गर्दी, दरवाजे बंद करून प्रवाशांना रोखणे आणि फलाटावरील गर्दी यामुळे प्रवाशांच्या अडचणी कायम असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विशेष गाड्यांसोबतच गर्दीचे प्रभावी नियोजन आणि प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

