मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेतील ठाकरेसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आमच्या नगरसेवकांविरोधातील प्रकरणांमध्ये दणादण निर्णय घेतले जात आहेत; मात्र सत्ताधारी गटातील नगरसेवकांविरोधातील प्रकरणांचा निकाल का लागत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. ही लढाई आम्ही न्यायालयात लढूच; मात्र त्यासाठी आठ-दहा ते पंधरा वर्षे जातील, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. विशाखा राऊत यांच्या नगरसेवकपद रद्द करण्याच्या कारवाईबाबत बोलताना ते म्हणाले की, ही लढाई आम्ही न्यायालयात लढणार आहोत. मात्र आमच्या नगरसेवकांना दणादण बाद केले जात असताना सत्ताधारी गटातील नगरसेवकांविरोधात आक्षेप आणि प्रकरणे असतानाही त्यांचे निकाल का लागत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जातीच्या प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरही ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केले. आम्ही जातीची प्रमाणपत्रे नाक्यावरच्या दुकानातून घेतलेली नाहीत आणि त्यांनीही ती कुठल्या फार मोठ्या ठिकाणाहून घेतलेली नाहीत. जिथून आम्ही प्रमाणपत्रे घेतली आहेत, तिथूनच त्यांनीही घेतली आहेत, असे ते म्हणाले. आमच्या बाबतीत दणादण निर्णय घेतले जात असतील, तर ही बेबंदशाही सुरू असल्याचे स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली.
आमच्या नगरसेवकांवर कारवाई करून त्यांना बाद ठरवत असाल, तर सत्ताधारी गटातील ज्या नगरसेवकांवर आक्षेप आहेत, त्यांच्यावरही तशीच कारवाई झाली पाहिजे. एकतर्फी कारवाई चालणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या आक्रोश मोर्चालाही उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. नीट परीक्षेतील गोंधळाच्या वेळी जंतरमंतरवर आंदोलन करणारे अभिजीत दिपके तसेच ज्यांना ‘कॉकरोच’ म्हणून हिणवण्यात आले, त्यांना उघडपणे पाठिंबा देणारा ठाकरेसेना हा पहिला राजकीय पक्ष असल्याचा दावाही त्यांनी केला.

