मुंबई प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात गुजरातमधील ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि राष्ट्रार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सायंकाळी मुंबईत दाखल होत ते ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) २०२६चे उद्घाटन करणार आहेत. या वेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
पंतप्रधानांच्या दौऱ्याची सुरुवात वडोदरा येथून होणार आहे. दुपारी सुमारे १२ वाजता ते विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. त्यानंतर सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल.
पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गाचे महत्त्वाचे टप्पे कार्यान्वित
वडोदरा दौऱ्यात पंतप्रधान पश्चिम विभागीय समर्पित मालवाहू कॉरिडॉरअंतर्गत (WDFC) ३२६ मार्ग किलोमीटर लांबीच्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांचे राष्ट्रार्पण करणार आहेत. साणंद (उत्तर)-मकरपुरा, न्यू उंबरगाव-न्यू सफाळे आणि न्यू सफाळे-जेएनपीटी या टप्प्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पांवर २० हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे.
या मार्गामुळे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाशी थेट रेल्वे जोडणी उपलब्ध होणार असून, आयात-निर्यात मालवाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. औद्योगिक केंद्रे आणि बंदरांमधील संपर्क अधिक सक्षम होईल, रसद खर्चात बचत होईल आणि मुंबईतील विद्यमान रेल्वे मार्गावरील मालवाहतुकीचा ताणही कमी होण्याची अपेक्षा आहे.
या टप्प्यांच्या कार्यान्वयनानंतर समर्पित मालवाहू कॉरिडॉरचे संपूर्ण जाळे कार्यरत होणार आहे. त्यामुळे देशातील बहुविध वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन मालवाहतुकीचा वेळ कमी होण्यासह विविध प्रदेशांमधील वस्तूंची जलद आणि सुरळीत वाहतूक शक्य होणार आहे.
पंतप्रधान न्यू साणंद (उत्तर), न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू जेएनपीटी, मुंबई येथून सुटणाऱ्या मालगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. तसेच वडोदरा-टांडा रोडदरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेचाही प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे.
आदिवासी भाग रेल्वेच्या नकाशावर
छोटा उदेपूर-धार रेल्वे प्रकल्पाचा भाग असलेल्या जोबट-टांडा रोड या नव्या रेल्वेमार्गाचेही पंतप्रधान राष्ट्रार्पण करणार आहेत. या मार्गामुळे अलिराजपूरमधील दुर्गम आणि आदिवासी भाग राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडला जाणार आहे. त्यामुळे या भागातील प्रवास, व्यापार आणि दळणवळणाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय ३२९ किलोमीटर लांबीच्या आणि ९ हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या तीन रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. वडोदरा-रतलाम तिसरी व चौथी रेल्वे लाईन, मियागम कर्जन-चोरंडा-मालसर गेज रूपांतरण आणि विश्वामित्री-दाभोई दुहेरीकरण या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे गुजरात आणि मध्य प्रदेशमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होण्याबरोबरच प्रवासी आणि मालवाहतुकीची क्षमता वाढणार आहे.
महामार्ग प्रकल्पांनाही गती
पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे १ हजार ७८० कोटी रुपयांच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील कामरेज-चलथान विभागाचे सहापदरीकरण, वडोदरा-सुरत मार्गावर तापी व नर्मदा नद्यांवरील प्रमुख पुलांसह अतिरिक्त संरचनांचे बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील अभावा, मिंधोला व खजोड जंक्शन येथे ग्रेड-सेपरेटेड संरचना उभारण्याचा त्यामध्ये समावेश आहे.
याशिवाय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील कंदारी चौकडी आणि लुवारा पाटिया येथे सहापदरी उड्डाणपुलांचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. अपघातप्रवण क्षेत्रांवरील समस्या दूर करून रस्ते सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांना महत्त्व आहे.
गुजरातमधील नागरी प्रकल्पांचेही उद्घाटन
गुजरात सरकारच्या सुमारे २ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. वडोदरा शहरी विकास प्राधिकरणाच्या रिंग रोडचा दुसरा टप्पा, कडणा धरणावरील ११० मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर प्रकल्प आणि वडोदरा महानगरपालिकेच्या नवीन कार्यालयाचा त्यामध्ये समावेश आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांसह पूर्व वडोदरातील ११ गावांच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
मुंबईत फिनटेक क्षेत्रातील जागतिक दिग्गजांची उपस्थिती
गुजरात दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६चे उद्घाटन करतील. सातवा ग्लोबल फिनटेक फेस्ट ८ ते ११ सप्टेंबरदरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.
जागतिक वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील धोरणकर्ते, नियामक संस्था, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक आणि तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच अन्य भागधारकांना एकत्र आणणारे हे महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते.
यंदाच्या फेस्टची संकल्पना ‘प्रभाव पाडण्याची क्षमता : एजेंटिक एआय, टोकेनायझेशन, क्वांटम – सर्वसमावेशक वित्तासाठी विश्वसनीय, जोडलेल्या, जागतिक प्रणाली’ अशी आहे.
डिजिटल पेमेंट आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधिक बळकट करण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रोग्रामेबल फायनान्स, क्वांटम तंत्रज्ञान आणि अन्य उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वित्तीय क्षेत्रावर होणारा परिणाम यावर फेस्टमध्ये मंथन होणार आहे.
धोरण, नियमन, तंत्रज्ञान, भांडवल आणि उद्योग या पाचही घटकांना एकाच व्यासपीठावर आणत वित्तीय क्षेत्राचे भवितव्य घडविण्याच्या दिशेने GFF २०२६मध्ये विचारमंथन होणार असल्याने पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याकडे वित्तीय आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे.

