
मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांची लाइफलाइन म्हणजे लोकल. मात्र लोकलसाठी अनेकदा मुंबईकरांना ताटकळत उभं राहावं लागतं. कित्येकदा लोकल नेहमीच्या वेळेपेक्षा उशिराच येते.
त्यामुळं नोकरदाराच्या संपूर्ण वेळेचे गणित बिघडते. पण आता हा वेळ वाचणार आहे. कारण दोन लोकलमधील अंतर दोन मिनिटे कऱण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेय.
प्रवाशांचा प्रवास वेळ वाचवण्यासाठी लोकलचा वेग वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने गेल्या वर्षी घेतला होता. त्यानुसार आता लोकलचा वेग वाढविण्यावर काम करण्यात येत आहे. दोन लोकलमधील वेळ कमी करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
दोन लोकलमधील वेळ १८० सेकंदाचा आहे, त्याला आधी १५० सेकंद करण्यात येईल. त्यानंतर हा वेळ १२० सेकंदावर आणला जाईल, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. त्याशिवाय गर्दी कमी कऱण्यासाठी लोकल वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकलच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तीन्ही मार्गांवर लोकलला कवच प्रणालीबरोबरच कम्बाइन कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सीबीटीसी यंत्रणा जोडली जाणार आहे. त्यामुळं दोन लोकलमधील अंतर 180 सेकंदावरुन 150 सेकंद म्हणजेच अडीच मिनिटांवर येणार आहे. त्यानंतर हे अंतर १२० सेकंदावर येईल.