काशिगाव प्रतिनिधी
काशिगाव : प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत घर मंजूर झाल्याचे आमिष दाखवून काशिगाव येथील एका महिलेची ४ लाख १४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या फसवणुकीसाठी सायबर भामट्यांनी दाक्षिणात्य अभिनेता व तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या नावाचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे.
काशिगाव येथील निलकमल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सीमा पाटील यांना व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून यूट्यूबची लिंक पाठविण्यात आली. त्यानंतर संपर्क साधलेल्या अज्ञात व्यक्तीने विजय थलपती यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत सीमा पाटील यांचे नाव मंजूर झाल्याचे सांगितले.
घरकुल योजनेचे अनुदान बँक खात्यात जमा होणार असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावाखाली संबंधिताने पैसे मागितले. त्याच्या सांगण्यावरून सीमा पाटील यांनी दोन बँक खात्यांमधून विविध फोन-पे क्रमांकावर तब्बल २३ वेळा पैसे पाठविले. अशा प्रकारे एकूण ४ लाख १४ हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सीमा पाटील यांनी नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

