मुंबई प्रतिनिधी
मुंबई : माहीम पोलिस वसाहतीलगत असलेल्या रहेजा रुग्णालयाच्या परिसरात नाग जातीचा विषारी साप आढळून आल्याने काही काळ घबराट पसरली होती. मात्र, पोलिस कॉन्स्टेबल तथा सर्पमित्र सचिन मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नागाच्या पिल्लाला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडून रेस्क्यू केले.
रुग्णालयाच्या परिसरात साप आढळल्याची माहिती सचिन मोरे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तसेच मुंबई रेंज कार्यालयाच्या कंट्रोल रूमला याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर एका स्टोअर रूममध्ये नाग जातीचा विषारी साप असल्याचे निदर्शनास आले. सचिन मोरे यांनी अत्यंत सावधगिरीने सापाला पकडून सुरक्षितपणे बरणीत ठेवले.
रेस्क्यू करण्यात आलेला साप हा नाग जातीचा लहान पिल्लू असल्याने परिसरात आणखी पिल्ले असण्याची शक्यता सचिन मोरे यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वीही त्यांनी नाग जातीच्या विषारी सापांची पिल्ले सुरक्षितपणे रेस्क्यू केली आहेत.
दरम्यान, रुग्णालयातील नागरिकांना सापांविषयी माहिती देऊन त्यांच्यात असलेली भीती दूर करण्यात आली. तसेच साप दिसल्यास त्याला मारू नये, तर सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करत जनजागृती करण्यात आली. वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या नागाच्या पिल्लाला नंतर सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

