मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट नाकारल्याचा दावा वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. महापालिका कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आंबेडकर यांची आयुक्तांशी भेट होणार होती. मात्र, वेळ निश्चित करूनही प्रत्यक्ष भेट झाली नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकारावरून वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आयुक्तांनी प्रकाश आंबेडकर यांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
प्रकाश आंबेडकर हे मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, आयुक्तांकडून बैठक नाकारण्यात आल्याचे वंचितच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भेट नाकारण्यामागील नेमके कारण स्पष्ट करण्यात आले नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे आयुक्त अश्विनी भिडे या कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का, असा सवाल वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, महापालिका कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भेटीचा प्रयत्न करण्यात आल्याचे वंचितकडून सांगण्यात आले. कामगारांमध्ये नाराजी निर्माण झाल्यानंतर पालिका आयुक्तांच्या कार्यालयातून संपर्क साधण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. आयुक्तांच्या स्वीय सहायकांकडून फोन करून त्या भेटीसाठी थांबल्या असल्याचे सांगण्यात आले. मात्र, संबंधित पदाधिकारी भेटीसाठी पोहोचल्यानंतर आयुक्त उपस्थित नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप वंचितने केला.
सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत भेटीचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले होते. असे असताना प्रत्यक्ष भेट झाली नसल्याने वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक नेत्यांना भेटण्यासाठी प्रशासनाने स्पष्ट व पारदर्शक भूमिका ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली.
प्रकाश आंबेडकर यांची भेट वारंवार नाकारली जात असल्याचा दावा करत वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर टीका केली. भेट नाकारल्याच्या प्रकाराबद्दल आयुक्तांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि आयुक्त अश्विनी भिडे यांच्या भेटीबाबत वंचितकडून करण्यात आलेल्या आरोपांवर महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणावर पालिका प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

