मुंबई प्रतिनिधी
मुंबई : अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वांद्रे पश्चिमेतील हिल रोड परिसरात नाकाबंदीदरम्यान १७ वर्षीय मुलगा विनापरवाना स्कूटर चालवताना आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. चौकशीत वडिलांनीच स्कूटर आणि तिची चावी दिल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला.
१९ ऑगस्ट रोजी हिल रोड परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी संबंधित १७ वर्षीय मुलगा स्कूटर चालवताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला अडवून कागदपत्रांची तपासणी केली असता त्याच्याकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. चौकशीदरम्यान तो ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचेही समोर आले.
मुलाकडे अधिक चौकशी केली असता, त्याचे वडील रज्जा अब्दुल रहमान शेख (४५) यांनीच स्कूटर आणि तिची चावी आपल्याला दिल्याचे त्याने सांगितले. कारवाईपूर्वी त्याने सुमारे नऊ किलोमीटर स्कूटर चालवली होती. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतल्यानंतर आधारकार्डाची पडताळणी केली असता संबंधित मुलगा अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मीनाकुमारी शितोळे यांनी तक्रार दाखल केली. पुढील तपासात स्कूटर अजाज अझीझ अहमद खान यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी ही स्कूटर वापरण्यासाठी आपले मेव्हणे रज्जा शेख यांना दिली होती, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली.
अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यास देणे ही मोटार वाहन कायद्यानुसार गंभीर बाब मानली जाते. अशा प्रकारात पालक किंवा वाहनमालकावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. दोष सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होण्याची तरतूद आहे. तसेच संबंधित अल्पवयीन मुलाला वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन चालविण्याचा शिकाऊ किंवा कायमस्वरूपी परवाना मिळण्यावर निर्बंध येऊ शकतात.
या प्रकरणात पोलिसांनी मुलाच्या वडिलांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देताना पालकांनी काळजी घ्यावी, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

