कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये अचानक बिघडलेल्या हवामानामुळे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्या हेलिकॉप्टरचे मंगळवारी आपत्कालीन लँडिंग करावे लागले. उड्डाणादरम्यान हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे धुके, मुसळधार पाऊस आणि कमी झालेली दृश्यता लक्षात घेऊन पायलटने प्रसंगावधान राखत पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कोलाघाट येथे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवले. या घटनेत मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शुभेंदु अधिकारी हे दमदम येथून हेलिकॉप्टरने पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील केशपूरकडे रवाना झाले होते. केशपूर येथे महान स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्मा खुदीराम बोस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करण्याचा त्यांचा कार्यक्रम होता.
मात्र, प्रवास सुरू असतानाच हवामान अचानक प्रतिकूल झाले. परिसरात मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे हवाई मार्गातील दृश्यता कमी झाली. परिस्थिती धोकादायक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन पायलटने पुढील उड्डाण न करता हेलिकॉप्टर सुरक्षित ठिकाणी उतरवण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार कोलाघाट येथील एका मोकळ्या मैदानात हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. पायलटच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य धोका टळला. हेलिकॉप्टर सुरक्षितपणे जमिनीवर उतरल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हवामानाची स्थिती लक्षात घेता पुढील हवाई प्रवास करणे शक्य नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या प्रवासाचा मार्ग बदलण्यात आला. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था आणि नियोजित कार्यक्रम लक्षात घेऊन शुभेंदु अधिकारी रस्ते मार्गाने केशपूरकडे रवाना झाले.
दरम्यान, हेलिकॉप्टरच्या आपत्कालीन लँडिंगमुळे काही काळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्येही धावपळ उडाली. मात्र, कोणतीही जीवितहानी किंवा अनुचित घटना घडली नसल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.

