मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेने ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ अभियानाला गती दिली आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला आहे.
महापालिकेच्या विविध विभागांच्या आढावा बैठकीत त्यांनी पदपथांवरील बांधकाम साहित्य, राडारोडा, बेवारस वाहने, अयोग्य पद्धतीने उभी केलेली वाहने, कचऱ्याचे ढीग तसेच पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा ठरणारे असमान पृष्ठभाग तातडीने हटविण्याचे निर्देश दिले. तसेच अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्ज, बाहेरच्या बाजूस उघडणारे दरवाजे, नियमबाह्य रॅम्प आणि इतर भौतिक अडथळेही हटविण्याचे आदेश देण्यात आले.
सर्व सहायक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील पदपथांची दररोज प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमणविरोधी कारवाईची प्रभावी अंमलबजावणी करावी. केवळ अतिक्रमण हटवून थांबू नये, तर ती पुन्हा होणार नाहीत यासाठी सातत्याने देखरेख ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. प्रत्येक कारवाईचा ‘पूर्वी आणि नंतर’ अशा छायाचित्रांसह प्रगती अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त यांनी दैनंदिन, उपआयुक्तांनी आठवड्याला, तर अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी दर पंधरवड्याला या मोहिमेचा आढावा घ्यावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
परवानाधारक फेरीवाल्यांनीही त्यांना निश्चित करून दिलेल्या जागेतच व्यवसाय करावा, साहित्याची साठवणूक करावी आणि फलक लावावेत, याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबईतील सुमारे ५० टक्के दैनंदिन प्रवास पायी केला जात असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगत, पदपथांवर पुन्हा अतिक्रमण आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला.


