मुंबई प्रतिनिधी
माजी मंत्री आणि शिवसेनेचे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या मुंबईतील निवासस्थानी तब्बल २ कोटी ६५ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमध्ये सोन्याची बिस्किटे, हिऱ्यांचे दागिने, चांदीची मौल्यवान भांडी आणि रोख रकमेचा समावेश असल्याची माहिती आहे. या प्रकरणी अहिर यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील मौल्यवान वस्तू एकाच वेळी चोरीला न जाता टप्प्याटप्प्याने गायब झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. काही मौल्यवान वस्तू कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत माहिती घेतली. त्यानंतर घरातील ऐवजाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू गायब असल्याचे निदर्शनास आले.
घरातील व्यक्तीच्या सहभागाचा संशय
चोरीला गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत सुमारे २ कोटी ६५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. घरातील मौल्यवान वस्तू कुठे ठेवण्यात येतात, त्यांची सुरक्षितता कशी केली जाते आणि घरात कोणाची कधी ये-जा असते, याची माहिती असलेल्या व्यक्तीचा या चोरीत सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे.
घरात काम करणाऱ्या एका विश्वासू व्यक्तीवर संशय व्यक्त केला जात असला, तरी पोलिसांच्या तपासातूनच या चोरीमागील नेमका सूत्रधार कोण आहे, हे स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून घरातील कर्मचारी, नोकरचाकर तसेच संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात असून, चोरीच्या घटनाक्रमाची माहिती मिळवण्यासाठी विविध बाजूंनी तपास सुरू आहे.
गुन्हे शाखेकडून कसून तपास
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई गुन्हे शाखेने तपास हाती घेतला आहे. चोरी नेमक्या कोणत्या कालावधीत आणि कोणत्या पद्धतीने करण्यात आली, चोरीचा ऐवज कुठे नेण्यात आला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
एका वरिष्ठ राजकीय नेत्याच्या निवासस्थानी कोट्यवधींच्या ऐवजाची चोरी झाल्याने या घटनेची राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या प्रकरणातील संशयितांची भूमिका आणि चोरीचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.


