मुंबई प्रतिनिधी
‘नीट’ पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीसह देशातील विविध भागांत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांदरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या बळाच्या वापराचा बॉम्बे बार असोसिएशनने (बीबीए) निषेध केला आहे. त्याचवेळी आंदोलनाच्या नावाखाली सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेची तोडफोड आणि नुकसान करणाऱ्या प्रवृत्तींचाही बीबीएने निषेध केला. विद्यार्थी आणि सरकार या दोन्ही बाजूंनी संघर्षाचा मार्ग टाळून अर्थपूर्ण आणि विधायक संवाद साधावा, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.
बीबीएकडून बुधवारी रात्री उशिरा यासंदर्भात निवेदन जारी करण्यात आले. विद्यार्थ्यांवर लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केल्याच्या कथित घटनांबाबत प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांवर तसेच प्रसारित झालेल्या चित्रफितींवर असोसिएशनने चिंता व्यक्त केली. या चित्रफिती आणि वृत्तांमधील माहिती सत्य असल्यास, आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे बळाचा वापर होणे ही गंभीर बाब असून, कायद्याच्या राज्यात ते कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह ठरू शकत नाही, असे बीबीएने स्पष्ट केले.
कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी कोणत्याही परिस्थितीत संयम बाळगणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक नागरिकाच्या घटनात्मक अधिकारांचा आणि प्रतिष्ठेचा आदर राखला गेला पाहिजे, अशी भूमिका असोसिएशनने मांडली.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९ अंतर्गत नागरिकांना शांततेने एकत्र येऊन आपला विरोध व्यक्त करण्याचा अधिकार आहे. शांततापूर्ण आंदोलन हे लोकशाही व्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, असेही बीबीएने अधोरेखित केले. मात्र, आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार, तोडफोड अथवा सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान करणे कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नसल्याचेही असोसिएशनने स्पष्ट केले.
दरम्यान, आंदोलकांवर बळाचा वापर करणे तसेच एफआयआर दाखल करण्याच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांवर दबाव आणण्याच्या प्रकारांबाबतही बीबीएने नाराजी व्यक्त केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखताना प्रशासनाने संयम आणि संवेदनशीलता दाखवावी, अशी अपेक्षा असोसिएशनने व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांचा देशातील तरुणांच्या भविष्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्व संबंधित घटकांनी कायद्याचे राज्य, अहिंसा आणि खुल्या, प्रामाणिक व अर्थपूर्ण संवादाचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे, असे बीबीएचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ वकील नितीन ठक्कर यांनी सांगितले.


